Published On : Fri, Aug 9th, 2019

मनपाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायापालट करणाऱ्या

Advertisement

टाटा ट्रस्टच्या अधिकाऱ्यांचा महापौरांनी केला सत्कार

नागपूर : नागपूर महानगरपालिकेद्वारा संचालित नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायापालट करणाऱ्या टाटा ट्रस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सत्कार महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आला. टाटा ट्रस्टने आरोग्य सेवा सुसज्जित करण्यासाठी दिलेल्या सहकार्याचा आम्हाला अभिमान असल्याचे गौरवोद्‌गार याप्रसंगी त्यांनी काढले. नागपूर महानगरपालिकेसाठी अभिमानाची बाब म्हणजे नोव्हेंबर २०१८ महिन्यात हा उपक्रम इतर राज्यांना प्रेरणा देण्याकरिता काझीरंगा मध्ये झालेल्या ५ व्या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेत सादर करण्यात आला.

मनपा मुख्यालयातील महापौर कक्षात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात टाटा ट्रस्टचे मुख्य वित्त अधिकारी आशीष देशपांडे, टाटा ट्रस्ट कृषी विभागाचे प्रमुख श्री. गणेश, राजगोपाल राव, आदर्श नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र प्रकल्पाचे प्रमुख अमर नवकर, डॉ. टिकेश बिसेन यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि मनपाचे गौरवचिन्ह देऊन महापौर नंदा जिचकार यांनी सत्कार केला.

याप्रसंगी बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाले, नागरिकांना आरोग्य सुविधा देण्याचे कार्य नागपूर महानगरपालिका करते आहे. मात्र या सोयी-सुविधा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने टाटा ट्रस्टने केलेले आर्थिक सहकार्य, आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांना दिलेले प्रशिक्षण हे लाख मोलाचे आहे. यापुढेही टाटा ट्रस्टचे सहकार्य असेच राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महापौर नंदा जिचकार यांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू, असे टाटा ट्रस्टचे मुख्य वित्त अधिकारी आशीष देशपांडे यांनी सांगितले. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल त्यांनी आभार मानले. यावेळी उपसंचालक आरोग्य विभाग डॉ. भावना सोनकुसळे, आरोग्य अधिकारी डॉ. सरिता कामदार, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी यांच्यासह मनपाचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.