आ.कृष्णा खोपडे पोलीस आयुक्तांना भेटणार
नागपूर : संवेदनहीन पोलीस कर्मचा-यांच्या निर्दयतेमुळे मनोज ठवकर या दिव्यांग व्यक्तीचा मृत्यू झाला व त्याचे कुटुंब रस्त्यावर आले. वाहतुकीची मोठी वर्दळ असलेल्या पारडी चौकात पायाने व डोळ्याने देखील दिव्यांग असताना त्यांच्या मागे पोलिसांचे धावणे व एखाद्या शातीर गुन्हेगारासारखी वागणूक देणे, ही कुठली कारवाई? दिव्यांग असला तरी तो कुटुंबाचा आधार होता. मात्र त्यांच्या कुटुंबावर असा आघात करणा-या पोलीस कर्मचा-यांना निलंबित करण्यात इतका उशीर कां? पोलीस कर्मचा-यांनी मारहाण केल्याचे फुटेज कुठे गेले? पारडी पो.स्टे. मध्ये हा व्यक्ती मरण पावला, तेव्हा कुटुंबियांना सूचना न देता थेट रुग्णालयात घेऊन जाण्याचा मागे हेतू काय? वरिष्ठ अधिकारी यांचे व्दारे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे कां? अशी अनेक प्रश्न या घटनेसंदर्भात निर्माण होत असताना निष्पक्ष कारवाई होईल का? अशी शंका होणे साहजिक आहे. म्हणूनच सदर घटनेची सी.आय.डी. चौकशी करा, तसेच पोलीस विभागाच्या सहायता निधीतून पिडीत कुटुंबियांना तात्काळ मदत करा, अशी मागणी आमदार कृष्णा खोपडे यांनी केली आहे. या संदर्भात पोलीस आयुक्त यांची भेट घेणार असल्याचे देखील आमदार कृष्णा खोपडे यावेळी म्हणाले.
पोलीस आयुक्तांनी सक्तीने होत असलेली वसुली थांबवावी
झालेली घटना ही अत्यंत निंदनिय असून मी अनेकदा वर्तमानपत्राच्या माध्यमातून ट्राफिक विभागाच्या वसुलीबाबत वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. ट्राफिक पोलीस चौक सोडून डिप्टी सिग्नल रेल्वे क्रासिंग, प्रजापतीनगर व अनावश्यक त्या ठिकाणी वसुली करताना आढळतात. पूर्व नागपुरात सर्वाधिक मजूर वर्ग असलेल्या ठिकाणी वसुलीसाठी पोलीस सकाळपासूनच तैनात असतात.
या भागात मेट्रो व पारडी ब्रिजचे काम सुरु असून वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. रोजमजुरी करणारे नागरिक यांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी अनेकदा वाहतुकीत अडकून मृत्युमुखी पडल्याचा अनेक घटना या भागात झालेल्या आहेत. वसुलीची सक्ती केल्यामुळे अनेक नागरिकांच्या जीवावर बेतण्याच्या घटना यापूर्वी झाल्या आहेत. त्यामुळे पोलीस विभाग नाहकच बदनाम होत आहे. आता पारडीच्या घटनेमुळे अशा प्रकारच्या वसुली थांबविणे गरजेचे आहे. अन्यथा अशा घटनेची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा पोलीस आयुक्त यांनी स्वत: दखल घेऊन वाहतूक पोलीसांव्दारे होत असलेली सक्तीची वसुली थांबवावी.
