Published On : Tue, Sep 22nd, 2020

माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ अंतर्गत नागपुरात सर्वेक्षण सुरू

मृत्यू दर कमी करण्यासाठी मनपाचे पाऊल : नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

नागपूर : मागील दोन आठवड्यात राज्यातील कोव्हिड-१९ ने बाधित रुग्णांच्या मृत्यसंख्येत भर पडत आहे. यापुढे लोकसहभागातून कोव्हिडवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहीम राज्य शासनाने राबविण्याचे निश्चित केले असून नागपूर महानगरपालिका क्षेत्रात मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शना खाली याची सुरुवात झाली आहे.

या मोहिमेअंतर्गत शहरातील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी होणार आहे. अतिजोखमीचे आजार असल्यास उपचार आणि प्रत्येक नागरिकास व्यक्तीशः भेटून आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे. शहरात १५ सप्टेंबरपासून या मोहिमेला सुरुवात झाली असून आतापर्यंत मनपाची चमू ५१ हजार नागरिकांपर्यंत पोचली आहे.

सध्या झोनस्तरावर २७८ चमू कार्यरत असून येत्या काही दिवसात ३५० चमू सर्वेक्षणासाठी सज्ज असतील. सदर मोहिमेअंतर्गत एक पथक दररोज ५० घरांचा भेट देउन त्यांची संशयित कोव्हिड तपासणी व उपचारासंदर्भात मार्गदर्शन करेल. एका पथकामध्ये एक आरोग्य दोन स्वयंसेवक राहतील. प्रत्येक ५ ते १० पथकांमागे एक डॉक्टर उपचार व संदर्भसेवा देईल. पथकाद्वारे अतिजोखमीचे आजार असलेले व्यक्ती ओळखून त्यांना उपचार आणि कोव्हिड १९ प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण देण्यात येईल. याशिवाय ताप, खोकला, दम लागणे, ऑक्सिजन पातळी कमी असणे अशी कोव्हिडसदृष्य लक्षणे असणा-यांना जवळच्या ‘फिवर क्लिनिक’मध्ये नेउन त्यांची चाचणी केली जाईल व पुढील उपचार सुरू करतील. अतिजोखमीचे रुग्ण नियमीत उपचार घेतात का, याची खात्री करून आवश्यक ते मार्गदर्शन केले जाईल. पथकाद्वारे घरातील सर्व सदस्यांना व्यक्तीश: “कोव्हिड पूर्वी,” “कोव्हिडमध्ये” आणि “कोव्हिड नंतर” काय खबरदारी घ्याची याचे मार्गदर्शन केले जाईल. याच गृह भेटीच्या माध्यमातून “सारी” आणि “आयएलआय” रुग्णांचेही सर्व्हेक्षण करतील.

राज्यात कोव्हिड बाधित रुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ‘ट्रेस, ट्रॅक, ट्रीट’ या त्रिसुत्रीचा वापर करून कोव्हिडवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनलॉक सुरू असताना कोरोना नियंत्रण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी राज्यातील सर्व लोकसंख्येला दोन वेळा भेट देउन आरोग्य शिक्षण, महत्वाचे आरोग्य संदेश, संशयीत रुग्ण शोधणे तसेच मधुमेह, हृदयविकार, किडनी, आजार, लठ्ठपणा यासारख्या अतिजोखमीच्या व्यक्तींचा शोध घेण्यात येईल. या अभियानादरम्यान प्रत्येक व्यक्तीला आरोग्य शिक्षण व कोव्हिड प्रतिबंधाचे संदेश देण्यात येतील. संपूर्ण अभियान स्थानिक लोक प्रतिनिधी व नगरसेवकांच्या सहकार्याने राबविण्यात येईल.

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हे अभियान १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर या कालावधीमध्ये राबविण्यात येत असून अभियानाची दोन फेरीत विभागणी करण्यात आली आहे. पहिली फेरी १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या १५ दिवसाच्या कालावधीत होईल तर दुसरी फेरी १४ ते २४ ऑक्टोबर या १० दिवसांच्या कालावधी घेण्यात येईल.

पथकाद्वारे सर्व्हेक्षणादरम्यान प्रत्येक घरात शिरण्यापूर्वी दाराबाहेर स्टीकर लावणे, घरातील प्रत्येक सदस्याची अँडरॉईड मोबाईलच्या सहाय्याने ॲपमध्ये नोंद करणे आणि त्यानंतर त्यांची तपासणी करणे अनिवार्य आहे. सदर अभियान यशस्वी होण्यासाठी जनतेसह लोकप्रतिनिधी, स्थानिक नगरसेवक, स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग घेण्यात येणार आहे.

नागपूर मनपाने यासंदर्भात एक आदेश निर्गमित केले असून मोहिम योग्य प्रकारे राबविण्याच्या दृष्टीने झोनस्तरावर अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात येणाऱ्या मोहिमेसाठी प्रत्येक झोनचे सहायक आयुक्त अंमलबजावणी अधिकारी म्हणून तर संबंधित झोनचे क्षेत्रीय आरोग्य अधिकारी सहायक अंमलबजावणी अधिकारी म्हणून कार्य करतील. प्रत्येक झोनचे समन्वय करण्यासाठी स्वतंत्र दहा अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी मोहिमेचे नियंत्रण व प्रमुख समन्वय अधिकारी म्हणून कार्य करतील.

सर्व्हेक्षणासाठी खासगी रुग्णालय, स्वयंसेवी संस्थाचे स्वयंसेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांचे सहकार्य घेण्यात येईल. जनसंपर्कासाठी लोकप्रतिनिधींचेही सहकार्य घेण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा यांनी दिली.

राज्यस्तरावर बक्षीस योजना

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत राज्य शासनाद्वारे व्यक्ती आणि संस्थांसाठी बक्षीस योजना सुरू करण्यात आली आहे. व्यक्तींसाठी निबंध, पोस्टर, आरोग्य शिक्षण संदेशाच्या स्पर्धा घेण्यात येतील. ही योजना विद्यार्थी, पालक व सामान्य व्यक्तींसाठीही लागू राहिल. स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणा-याला ५ हजार, द्वितीय क्रमांकाला ३ हजार व तिस-या क्रमांकासाठी २ हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येईल.

संस्थांसाठीच्या स्पर्धेत वेगवेगळ्या संस्थांच्या कामकाजानुसार बक्षिस देण्यात येईल. यामध्ये जिल्हास्तरावर नागरी आणि ग्रामीण असे दोन विभाग असतील. प्रत्येक विभागात प्रथम ३ संस्था निवडण्यात येतील व त्यांना बक्षीस दिले जाईल. स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणा-या संस्थेला ५० हजार, द्वितीय क्रमांकासाठी ३० हजार व तृतीय क्रमांकासाठी २० हजार रुपये बक्षीस देण्यात येईल.