Published On : Tue, Sep 22nd, 2020

मागणीच्या दृष्टीने नियोजन करा…!

उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीची ऑक्सिजन पुरावठादारांना सूचना

नागपूर : कोरोनामुळे रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. यामुळे ऑक्सिजनची मागणीही वाढली आहे. भविष्यात ही मागणी मोठ्या प्रमाणात वाढू शकते. त्यादृष्टीने नियोजन करा अशा सूचना उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने केल्या.

कोव्हिडची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता बेड्सची संख्या वाढावी या अनुषंगाने खासगी रुग्णालयांच्या आणि रुग्णांच्या समस्या जाणून घेयासाठी उच्च न्यायालयाने महापौरांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीचे गठन केले आहे. या समितीने मंगळवारी (ता. २२) ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा करणाऱ्याची बैठक बोलावली होती. सदर बैठकीत समितीचे अध्यक्ष महापौर संदीप जोशी यांनी प्रस्तूत सूचना केली. बैठकीला अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आय.एम.ए.च्या अध्यक्ष डॉ. अर्चना कोठारी, अन्न व औषधे प्रशासन विभागाचे सह आयुक्त महेश गडेकर उपस्थित होते.


यावेळी ऑक्सिजन निर्माते आणि पुरवठादारांनी आपल्या समस्या आणि अडचणी समितीपुढे मांडल्या. अनेक रुग्णालयात ऑक्सिजनचा साठा करून ठेवण्यात येतो. त्यामुळे इतरांना ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. सध्या कच्चा माल भिलाईसारख्या शहरातून आणला जातो. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढला आहे. अत्यावश्यक सेवेमुळे आता २४ तास सज्ज राहावे लागते. त्यामुळे मजुरांचा खर्च वाढला आहे.. त्यांना अतिरिक्त रक्कम द्यावी लागते. वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. या कारणामुळे सरासरी २५ ते ३० टक्क्यांनी दर वाढवावा लागला असल्याचेही ऑक्सिजन निर्मात्यांनी सांगितले.

यावर बोलताना समितीचे अध्यक्ष महापौर संदीप जोशी यांनी परिस्थिती पाहून नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. सध्याची परिस्थिती गंभीर आहे. आपला व्यवसाय असला तरी पूर्णपणे शक्य तसे सहकार्य करा, असे आवाहनही त्यांनी केले. पुरवठादारांनी सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन समितीला दिले.