Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

Nagpur City No 1 eNewspaper : Nagpur Today

| | Contact: 8407908145 |
Published On : Fri, May 17th, 2019
maharashtra news | By Nagpur Today Nagpur News

तामसवाडीजवळील कन्हान नदी पात्राची कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी केली पाहणी

नागपूर: तामसवाडीजवळील कन्हान नदीच्या पात्रात रेती उत्खननासाठी रस्ता तयार करून पाण्याचे प्रवाह रोखण्याचा वेकोलिच्या कंत्राटदाराचा प्रताप पुढे येताच कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे व जलप्रदाय समिती सभापती विजय झलके यांनी गुरूवारी (ता.१६) सदर ठिकाणी भेट देउन पाहणी केली. यावेळी जलप्रदाय विभागाचे प्रभारी उपअभियंता प्रमोद भस्मे, कनिष्ठ अभियंता मनोज संगीडवार, ओसीडब्ल्यूचे प्रकल्प प्रभारी (कन्हान) दिनेश अटाळकर उपस्थित होते.

कन्हान नदी पात्रातील जागा वेकोलिला लिजवर देण्यात आली असून कंत्राटदाराला रेती काढण्याची जिल्हाधिका-यांकडून परवानगी असल्याचा दावा करण्यात येत असून संबंधीत कागदपत्रांची चौकशी करणे व पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होणारी ठिकाणे तातडीने मुक्त करण्याचे निर्देश यावेळी कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी दिले. नदी व संबंधीत जागेची जबाबदारी जलसंपदा विभागाची असल्याने अशा ठिकाणी जलसंपदा विभागाची देखरेख असणे आवश्यक आहे. वेकोलिकडे संबंधीत जागेची लिज असली तरी त्यांच्या कार्यामुळे शहरातील नागरीकांचे दैनंदीन जीवन बाधीत होउ नये यासाठी मनपाने वेकोलिसह समन्वय साधून कार्य करण्याची गरज असल्याचेही कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी सांगितले.

नवेगाव खैरी येथून कन्हान जलशुद्धीकरण केंद्रासाठी कालव्यातून पाणी सोडले जात असूनही कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातील इन्टेकवेलच्या पाण्याची पातळी वाढत नसल्याचे निदर्शनास आले. या बाबीची दखल घेत मनपाच्या जलप्रदाय विभाग व ओसीडब्ल्यूच्या पथकातर्फे कन्हान नदी परिसराची पाहणी करण्यात आली. या पाहणीमध्ये तामसवाडीजवळील कन्हान नदी पात्रात वेकोलिच्या कंत्राटदाराने रेती काढण्यासाठी नदीमध्ये पाईप टाकून रस्ता तयार केल्याचे निदर्शनास आले. नदीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करण्यात आल्यामुळे त्याचा प्रभाव शहरातील पाणी पुरवठ्यावर पडत होता. याप्रकरणी मनपाने तातडीने कार्यवाही करीत अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी वेकोलिचे सहायक महाव्‍यवस्थापक डी.एम. गोखले यांच्याशी चर्चा करून सदर रस्ता तातडीने हटविण्याचे निर्देश दिले. त्यानंतर नदीचा प्रवाह मोकळा झाला असून पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. या पाण्याच्या पातळीमध्ये रात्री पुन्हा वाढ होउ शकेल. सद्या सुरळीत पाणी पुरवठा सुरू आहे, अशी माहिती जलप्रदाय विभागातर्फे देण्यात आली आहे.

Stay Updated : Download Our App
Mo. 8407908145