Published On : Sun, Apr 12th, 2020

निराधार बेघरांना मनपाच्या निवारा केंद्राचा आधार

Advertisement

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात सुरु असलेल्या लॉकडाऊनदरम्यान नागपूर महानगरपालिकद्वारे नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांच्या मार्गदर्शनात नियमितपणे बेघर शोध मोहीम अभियानांतर्गत शहरातील विविध भागातून रस्त्यावर राहणाऱ्या आणि फुटपाथवर झोपणाऱ्या बेघरांना शोधून मनपाच्या बेघर निवाऱ्यांमध्ये नेण्यात येत आहे.

शुक्रवार १० एप्रिल रोजी बेघरांसाठी शोध मोहीम राबवून नागपूर शहरातील मिठा नीम दर्गा, संविधान चौक, रेल्वे स्थानक परिसर, सी. ए. रोड, मेयो हॉस्पिटल, अग्रेसन चौक अशा विविध भागांमधून ९८ निराश्रीत बेघर आणि भिक्षुकांना शोधून मनपाच्या निवारागृहात आणून आश्रय देण्यात आला आहे.

महापालिका आणि पोलिसांच्या वाहनांतून त्या सर्व बेघर व्यक्तींना बेघर निवाऱ्यापर्यंत सोडण्याची सोय करण्यात आली. निवारागृहात केस कापणे, पाणी, स्वच्छतागृह, गादी, चादर, कपडे, सुरक्षा, भोजन, नाश्ता आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

निवाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी लाभार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे व आवश्यक तो औषधोपचार करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेचे धडे दिले जात आहे. मास्क व सॅनिटायझरसुद्धा उपलब्ध करून दिले जात आहे. यामुळे बेघर व निराधारांना बेघर निवारा केंद्राचा मोठा आधार मिळाला आहे.

‘बेघर शोध मोहीम’ अभियानाच्या यशस्वीतेकरीता मनपाचे प्रमोद खोब्रागड़े, विनय त्रिकोलवार, नूतन मोरे यांच्यासह मनपा समाज कल्याण विभाग तसेच स्वयंसेवी संस्थेचे कर्मचारी कार्य करीत आहेत.