नागपूर : दक्षिणेतील बाहुबली फेम सुपरस्टार प्रभास यांचे मेहुणे आणि नागपूरमधील नामवंत शासकीय कंत्राटदार पेनमाचा वेंकटेश्वर वर्मा (वय ६१) यांनी सोमवारी सकाळी नागपूरच्या राजनगर भागातील निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली. शासन विभागांकडे अडकून पडलेली तब्बल ४० कोटी रुपयांची थकबाकी व कर्जफेडीचा ताण यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
अभिनेता प्रभास यांच्याशी थेट नाते-
वर्मा यांच्या पत्नी अनुराधा या प्रभास यांच्या चुलत बहिण आहेत. त्यामुळे वर्मा हे प्रभास यांचे मेहुणे (Brother-in-law) होते. काही दिवसांपूर्वीच वर्मा हैदराबादमध्ये जाऊन प्रभास यांची भेट घेऊन आले होते. त्यामुळे या घटनेने केवळ नागपूरच नव्हे तर तेलुगू चित्रपटसृष्टीतही मोठी खळबळ उडाली आहे.
थकबाकी व कर्जाचा बोजा-
वर्मा यांच्या ‘एम/एस श्री साई असोसिएट्स’ या फर्मअंतर्गत दोन हॉट मिक्स प्लांट्स होते. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), आदिवासी विकास, हायब्रिड अॅन्युइटी मॉडेल (HAM) रस्ते प्रकल्प, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMCH) यांची अनेक कामे केली होती. मात्र, त्यांचे तब्बल ४० कोटी रुपये थकीत होते. कामगारांना पगार व प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी त्यांनी बँक व खासगी संस्थांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले. वाढता कर्जाचा ताण आणि थकबाकी न सुटल्याने त्यांनी आत्महत्या केली, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
घटनेचा तपशील-
सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांचे मित्र महेश बियानी घरी गेले असता, प्रतिसाद मिळाला नाही. सुरक्षा रक्षक व घरकाम करणाऱ्या महिलेच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला असता वर्मा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. त्यांचा मृतदेह मेयो रुग्णालयात पाठवण्यात आला. घटनेत कोणतीही चिठ्ठी आढळली नाही; मात्र मोबाईल जप्त करून चौकशी सुरू आहे.
ठेकेदारांचा संताप-
गेल्या आठवड्यात नागपूरमध्ये ठेकेदारांनी संविधान चौकात “भीक मागून आंदोलन” करत शासनाकडून थकबाकी तातडीने द्यावी, अशी मागणी केली होती. “शेतकऱ्यांप्रमाणे आता ठेकेदार आत्महत्येला प्रवृत्त होत आहेत. सरकारने नवे प्रकल्प देण्यापूर्वी जुनी बिले चुकती करावीत,” असे संघटनेचे अध्यक्ष सुबोध सारोडे यांनी सांगितले.
कुटुंबीयांवर शोककळा-
वर्मा यांचा मुलगा हैदराबादमध्ये आयटी क्षेत्रात काम करतो, तर मुलगी डॉक्टर आहे. पत्नी अनुराधा हैदराबाद व नागपूर असा वारंवार प्रवास करत असतात. मंगळवारी त्यांचा अंत्यविधी माणकापूर घाटावर होणार आहे.









