Published On : Mon, May 20th, 2019

पारडी उड्डाण पूलाबाबत आयुक्तांनी घेतली बैठक

कामाला गती देण्याचे निर्देश: विशेष सेल गठीत

नागपूर: पारडी येथील उड्डाण पूलाच्या संथगतीने होणा-या कामाला गती देण्याच्या उद्देशाने सोमवारी (ता.२०) मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, माजी महापौर ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, नरेंद्र (बाल्या) बोरकर, नगरसेवक दीपक वाडीभस्मे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुमारे तीन तास अधिका-यांची बैठक घेतली.

बैठकीत अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग) महेश धामेचा, सहायक संचालक (नगररचना) प्रमोद गावंडे, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, कार्यकारी अभियंता (स्लम) राजेंद्र रहाटे, अमीन अख्तर, सहायक आयुक्त विजय हुमने, अशोक पाटील, प्रकाश वराडे, हरीश राउत, मनोज अग्रवाल यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग व मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.

पारडी उड्डाण पूलाच्या कासव गतीने होणा-या कामामुळे दोन बहिणींना जीव गमवावा लागला. या मार्गाच्या संथगतीबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही नाराजी वर्तविली. हॉटेल गोमती ते ऑक्ट्रॉय नाका पारडी या मुख्यमार्गावर कामाच्या गतीला भूसंपादन प्रक्रिया बाकी असल्याचे कारण देण्यात येत होते. मुळात हॉटेल गोमती ते ऑक्ट्रॉय नाका पारडी या मार्गावर भूसंपादनाचा कोणताही विषय नसल्याचेच निदर्शनास आले आहे. त्यामुळे अधिका-यांनी या मार्गावरील कामाला प्रथम प्राधान्य देत उड्डाण पूलाच्या कार्याला गती देण्याची कार्यवाही त्वरीत करावी, असेही निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.

पारडी पूलासह शहरातील केळीबाग रोड, भंडारा रोड आदी ठिकाणीही रस्त्याचे काम सुरू असून या ठिकाणी भूसंपादनाची प्रक्रिया त्वरीत पूर्ण व्हावी यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी विशेष सेल गठीत करण्यात आल्याची माहिती बैठकीत दिली. विशेष सेलचे नेतृत्व सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग) महेश धामेचा यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. भूसंपादन करावयाचे असलेल्या मार्गांवरील भागातील जबाबदारी असलेल्या अधिका-यांनी या कामाला प्रथम प्राधान्य देत भूसंपादनबाधीत नागरिकांशी संपर्क साधून दररोज भूसंपादनाबाबत रजिस्ट्री करण्याचेही निर्देश दिले. या कामाबाबत कोणताही बेजाबदारपणा, कामचुकारपणा होउ नये यासाठी आयुक्त सभागृहात दररोज सकाळी १० वाजता अधिका-यांची बैठक घेण्यात येणार आहे. संबंधित विभागाच्या अधिका-यांनी एकमेकांशी समन्वय साधून या कामाला गती द्यावी व त्याचा रोजचा अहवाल बैठकीत सादर करण्याचे निर्देशही आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.

पारडी मार्गावर दररोज होणार अतिक्रमण कारवाई
पारडी येथील उड्डाण पूलाचे काम आणि अतिक्रमण यामुळे येथील मुख्य मार्गावर नेहमी वाहतुकीची समस्या असते. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत मनपाने कठोर पवित्रा घेत या भागात दररोज अतिक्रमण कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. येथील अतिक्रमण कारवाईसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून पोकलेन व टिप्पर देण्यात येणार असून पोलिस बंदोबस्तात मनपाचे अधिकारी अतिक्रमण हटविण्याची कारवाई करणार आहेत.