Published On : Mon, May 20th, 2019

जनजागृतीतून दिला वीज बचतीचा संदेश

जगनाडे चौकात पोर्णिमा दिवस : मनपा-ग्रीन व्हिजीलचे आयोजन

नागपूर: तत्कालिन महापौर आमदार प्रा. अनिल सोले यांच्या संकल्पनेतून काही वर्षांपूर्वी नागपूर महानगरपालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या पोर्णिमा दिवसाचे आयोजन आजही ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या सहकार्याने होत आहे. बुद्ध पोर्णिमेच्या दिवशी शनिवारी (ता. १८) जगनाडे चौकात मनपा अधिकाऱ्यांनी आणि ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसेवकांनी वीज बचतीसंदर्भात जनजागृती करण्यात आली.

रात्री ८ ते ९ या वेळेत अनावश्यक वीज दिवे बंद करण्याचे आवाहन स्वयंसेवकांनी नागरिकांना व व्यापाऱ्यांना आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत परिसरातील नागरिकांनी अनावश्यक वीज दिवे बंद केले.

सदर उपक्रमात मनपाच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता ए. एस. मानकर, उपअभियंता एम. एम. बेग, कनिष्ठ अभियंता पी. एम. कालबांडे, कनिष्ठ अभियंता दिलीप वंजारी, कनिष्ठ अभियंता एस.बी. ढगे, किशोर मस्के उपस्थित होते. ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांच्या नेतृत्वात ग्रीन व्हिजीलच्या टीम लीडर सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, बिष्णुदेव यादव, शीतल चौधरी, दिगंबर नागपुरे, प्रिया यादव, दादाराव मोहोड आदींनी व्यापारी व नागरिकांना ‘पोर्णिमा दिवस’ उपक्रमाची माहिती दिली. पोर्णिमा दिवसाच्या निमित्ताने अनावश्यक वीज दिवे बंद केल्याने आतापर्यंत लाखो यूनीट विजेची बचत झाल्याचे त्यांनी सांगितले. नागपुरात सुरू असलेल्या या उपक्रमाची दखल देशपातळीवर घेण्यात आली असून पंतप्रधानांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. त्यामुळे प्रत्येक पोर्णिमा दिवसाला किमान एक तास अनावश्यक वीज दिवे बंद करून वीज बचत करा, असे आवाहन त्यांनी केले. या आवाहनाला प्रतिसाद देत साऱ्यांनीच अनावश्यक वीज दिवे बंद केले. यापुढे प्रत्येक पोर्णिमा दिवसाला वीज दिवे बंद ठेवण्याचे आश्वासन नागरिकांनी दिले. या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुकही केले.