नागपूर : नागपुरातील वाठोडा येथील एका किशोरवयीन मुलाने बुधवारी राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षेत (नीट) चांगली रँक न मिळाल्याने आत्महत्या केली. भावेश तेजूसिंग राठोड असे मृत मुलाचे नाव असून तो पिंपरी वनपरिक्षेत्र, ता. कारंजा (लाड), जिल्हा वाशिमचा रहिवासी होता.
भावेश हा प्लॉट क्रमांक ८३, शिवसुंदर नगर, वाठोडा येथील लीलाधर राठोड यांच्या घरी भाड्याच्या खोलीत राहत होता. पहाटे चारच्या सुमारास तो छताच्या हुकला दोरीने लटकलेला आढळून आला. घरमालक व शेजाऱ्यांनी भावेशला खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
वाठोडा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता त्यांच्या खोलीत सुसाईड नोट सापडली. प्रथमदर्शनी पोलिसांनी सांगितले की, भावेशला कमी गुण मिळाल्याने तो नैराश्यात आला होता. त्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी NEET-UG परीक्षेचा निकाल जाहीर झाला तेव्हा भावेशला एकूण 720 पैकी 588 गुण मिळाले, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने भावेशने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.