
नागपूर : शहराला हादरवून सोडणारी एक अत्यंत वेदनादायक घटना लकडगंज परिसरात घडली आहे. जूनी मंगलवारी भागात १३ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसरात हळहळ आणि शोककळा पसरली आहे.
मृत विद्यार्थ्याचे नाव हाशिर शाहनु शाह असून तो सातवीत शिक्षण घेत होता. २८ एप्रिल रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास त्याने घराच्या दुसऱ्या मजल्यावर दुपट्ट्याच्या सहाय्याने रेलिंगला गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कुटुंबीयांनी तात्काळ त्याला मेयो रुग्णालय येथे दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरातही शोकमय वातावरण आहे. एवढ्या लहान वयात विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचलल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
दरम्यान, वडील शाहनु रफिक शाह यांच्या तक्रारीवरून लकडगंज पोलीस ठाणे येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास करत आहेत.








