नागपूर : ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहारासंदर्भातील ऑडिओ क्लिपवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपवण्याची सुपारी कोणी घेतली होती आणि मनोज जरांगे यांना मदत कुणी केली, असे सवाल भाजपच्या नेत्यांकडून उपस्थित केले जात असताना भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सूचक विधान केले आहे.
“कोणी कुणाला संपवू शकत नाही. माणूस स्वतःच्या चुकांमुळे अडचणीत येतो. जनतेचा आशीर्वाद पदाशी नव्हे, तर कामाशी संबंधित असतो,” असे मुनगंटीवार म्हणाले. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या प्रकरणावर भाष्य केले.
शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपला एकनाथ शिंदे यांची भीती वाटत असल्याचा दावा केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना मुनगंटीवार यांनी शिंदे यांना आपले मित्र संबोधले. मित्रांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणे योग्य नसल्याचे सांगत महायुतीतील नेत्यांनी अशी विधाने टाळावीत, असे आवाहनही त्यांनी केले. भाजप आणि शिवसेनेत दुरावा निर्माण करण्याचा हा प्रयत्न असू शकतो, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
ऑडिओ क्लिपवरून अटक करायची का?
५०० कोटी रुपयांच्या व्यवहाराच्या चर्चेवर प्रश्न उपस्थित करत मुनगंटीवार यांनी केवळ क्लिपच्या आधारे निष्कर्ष काढण्यास विरोध केला. अशा क्लिपच्या आधारे प्रत्येकाला अटक करायची का, असा सवाल त्यांनी केला. मनोज जरांगे हे सच्चे कार्यकर्ते असून ते पैसे घेतील, यावर आपला विश्वास नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
क्लिपपेक्षा दुष्काळावर चर्चा व्हावी-
राजकारणात परिपक्वता आवश्यक असल्याचे सांगत मुनगंटीवार यांनी ऑडिओ क्लिपपेक्षा दुष्काळाच्या प्रश्नाला महत्त्व देण्याची गरज व्यक्त केली. शेतकरी कष्टाने अन्न पिकवतो; मात्र त्याच्या समस्यांवर पुरेशी चर्चा होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) माध्यमातून तयार होऊ शकणाऱ्या क्लिपवरून राजकीय वातावरण तापवणे आणि राजकारणाचा स्तर घसरवणे योग्य नसल्याचेही ते म्हणाले.




