नागपूर -नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या “प्रत्येक पोलीस ठाणे हिरवेगार व्हावे” या संकल्पनेतून पारडी पोलीस ठाण्यात पर्यावरणपूरक वृक्षारोपण मोहिमेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. रविवारी सकाळी ८ वाजता पारडी पोलीस ठाणे परिसरात हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या मोहिमेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ‘मोरी प्रकल्प’, ज्याचे नेतृत्व पर्यावरणप्रेमी नागरिक सौ. शशिरेखा कानोरिया आणि सौ. आशा डागा यांनी केले. ‘मोरी’ या जपानी शब्दाचा अर्थ ‘जंगल’ असा असून, ब्रज भाषेत त्याचा अर्थ ‘माझे’ असा होतो. म्हणजेच, या परिसराला प्रत्येक नागरिकाने आपलेच मानावे, हा संदेश या नावातून देण्यात आला आहे.
स्थानिक वृक्षप्रजातींनी सजला पोलीस ठाण्याचा परिसर
या उपक्रमात करीपत्ता, तमालपत्र, पान, बेल, कवठ, जांभूळ, कडू लिंब, मुल्बरी अशा खाद्य वनस्पतींसह अडुळसा, वाळा (वेटिवर), बेहडा यांसारख्या औषधी वनस्पतींचेही वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षांचे उपयोग पोलीस कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन गरजांसाठी तर होतीलच, शिवाय पक्षी, कीटक व इतर जीवांना आश्रय देणारे नैसर्गिक आवास तयार होणार आहे.
मान्सूनपूर्व काळातच हा उपक्रम राबवून पूर्व नागपूरमध्ये जैवविविधतेला प्रोत्साहन देणारे एक हरित केंद्र निर्माण करण्याची दिशा घेतली गेली आहे.
मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपणास बहार-
कार्यक्रमास पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्यासह, सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, राजेंद्र डाभाडे, पोलीस उपायुक्त निकेतन कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल सिरसागर व सत्यवीर बंडीवार, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मंगट्टे आणि अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या उपक्रमाद्वारे पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यातील सहकार्याचे सुंदर उदाहरण निर्माण झाले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी पोलिसांनी उचललेला हा पाऊल नागपूर शहरात ‘हरित क्रांती’ घडवणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दरम्यान नागपूर पोलीस दलाने या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.