नागपूर: नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगळवारी (ता.१७) नाग नदीच्या संरक्षण भिंतीच्या कामासह अंबाझरी दहन घाटाकडे जाणाऱ्या नव्याने तयार करण्यात आलेल्या पुलाच्या कामाची पाहणी केली. पाहणीदरम्यान आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी कामासंदर्भात समाधान व्यक्त करीत उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
पाहणीदरम्यान मनपाचे मुख्य अभियंता श्री.मनोज तालेवार, धरमपेठ झोनचे कार्यकारी अभियंता श्री. मनोज गद्रे, उपअभियंता प्रमोद मोखाडे, कनिष्ठ अभियंता श्री.किशोर माथुरकर, प्रफुलवेद इन्फ्राचे श्री.प्रफुल्ल देशमुख, श्री.चेतन पवार यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सर्वप्रथम अंबाझरी दहन घाटाकडे जाणाऱ्या पुलाच्या कामाची पाहणी केली. अंबाझरी दहनघाटाकडे जाणारा पूल जीर्ण झाल्याने त्याला तोडून नव्याने पूल उभारण्यात आला आहे. २७ मीटर लांबीचा हा पूल पॉवर आर्च टेक्नॉलॉजीद्वारे तयार करण्यात आला आहे.विशेष म्हणजे, हा पूल सिंगल स्पॅनमध्ये बांधण्यात आला असल्याने नदीच्या पात्रात पुलाचे पिलर नाही. या पुलामुळे नाग नदीतील पात्रातील पाण्याचा प्रवाह अडणार नाही. याकरिता प्लास्टिकचे पाईप हाय डेन्सिटी पॉली इथलीन अर्थात एचडीपीई पाईपचा वापर करण्यात आला आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाला विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व्हीएनआयटीद्वारे मान्यता प्राप्त असल्याची माहिती आयुक्तांपुढे सादर करण्यात आली. यावेळी आयुक्त डॉ. चौधरी यांनी पुलाच्या कामाचे समाधान व्यक्त केले.
नंतर आयुक्त यांनी अंबाझरी घाटालगतच्या नाग नाग नदीला लागून असणाऱ्या संरक्षण भिंतीच्या कामाची पाहणी केली. याठिकाणी मजबूत संरक्षक भिंत उभारली जात आहे. ही कामे शेवटच्या टप्प्यात असून, लवकरात लवकर ही सर्व कामे पूर्ण करण्याचे ही निर्देश आयुक्त डॉ. चौधरी यांनी यावेळी दिले. तसेच आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी नदी सफाईच्या कामाबद्दलही समाधान व्यक्त केले.