Published On : Thu, Jun 10th, 2021

कोरोना रुग्णसंख्येचा पॉझिटिव्हिटी दर कमी करण्यात आरोग्य यंत्रणेला यश

Advertisement

दर ५ टक्के वाढला तर पुन्हा निर्बंध : नियमांचे पालन करण्याचे आवाहन

नागपूर : कोरोना महामारीने दुसऱ्या लाटेत बाधितांचा उच्चांक गाठला होता. मार्च आणि एप्रिल महिना कोरोनाच्या दृष्टीने नागपूरकरांसाठी अत्यंत वाईट ठरला. २९ मार्च रोजी नागपूरचा पॉझिटिव्हिटीचा दर चक्क ४५.२ टक्क्यांपर्यंत गेला होता. केवळ दोन महिन्यात पॉझिटिव्हिटी दराने नीचांक गाठला असून आता हा ५ टक्के पेक्षा कमी आहे. महाराष्ट्र शासनाने हा दर ग्राहय धरुन निर्बंध शिथिल केले आहे. मनपा प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने यावर आता नियंत्रण मिळविले आहे. ते सुद्धा कोरोना चाचणी कमी न होऊ देता. शहर आणि जिल्हयात आता सुद्धा ८००० पेक्षा जास्त चाचणी होत आहे. नागरिकांनी जास्तीत-जास्त प्रमाणात कोरोनाची चाचणी केली तर हा दर कमी ठेवण्यात मदत मिळू शकते. जर हा दर वाढला तर पुन्हा: निर्बंध लावले जाऊ शकतात.

Gold Rate
26 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,37,900/-
Gold 22 KT ₹ 1,28,200/-
Silver/Kg ₹ 2,28,500/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सध्या नागपूर शहर आणि जिल्हा मिळून आठ हजारांच्या वर कोरोना चाचण्या सुरू आहेत. आय.सी.एम.आर.च्या आकडेवारीनुसार मार्च आणि एप्रिलमध्ये बाधितांची सर्वाधिक संख्या होती. नागपूर शहर आणि जिल्हयात सर्वाधिक पॉझिटिव्हिटी दर ४ एप्रिल रोजी ४२.५ टक्के, ११ एप्रिल रोजी ४२.४४ टक्के आणि ६ एप्रिल रोजी ४१.१७ टक्के इतका नोंदविला गेला होता. कोरोना बाधितांची संख्या वाढल्यामुळे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. आणि जिल्हाधीकारी रवींद्र ठाकरे यांच्या नेतृत्वात वैद्यकीय आरोग्य यंत्रणेने कोरोना चाचणीची संख्या वाढविली. शासकीय, मनपा आणि खाजगी रुग्णालयात बाधितांना दाखल होण्यासाठी बेड्सची संख्या वाढविण्यात आली. नागपूर आणि जिल्ह्याच्या लोकसंख्येनुसार सर्वाधिक ऑक्सिजन बेड्स, आय.सी.यू. बेड्स आणि व्हेंटीलेटर्स बेड्स उपलब्ध करण्यात आले होते. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, महापौर दयाशंकर तिवारी यांनी यंत्रणेला सातत्याने मार्गदर्शन केले. नागपुरात ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्स, औषधी आदींची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या सर्वांचे योगदान मोलाचे ठरले.

सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ४५.२ टक्क्यांपर्यंत गेलेला पॉझिटिव्हिटी दराचा आलेख अत्यंत खाली घसरला आहे. जून महिन्यात पॉझिटिव्हिटी दर सातत्याने खाली घसरत आहे. १ जूनला २.७ टक्के, २ जून ला २.२६ टक्के, ३ जूनला २.२८ टक्के अशा प्रकारे पौझिटिव्हिटी दर नोंदविला गेला. आता हा सतत ५ टक्केच्या पेक्षा कमी आहे.

नागपुरात वैद्यकीय आरोग्य यंत्रणेने महामारीच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळविण्यात यश प्राप्त केले आहे. राज्य शासनाने पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्‌सची उपलब्धता यावरून जिल्ह्यांना पाच स्तरांमध्ये विभागले आहे. ज्यात नागपूरचा समावेश पहिल्या स्तरातील शहरांमध्ये करण्यात आला आहे. या मुळे महाराष्ट्र शासनातर्फे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. निर्बंध शिथिल करण्यात आले आहे तरी अजूनही नागरिकांना सावध राहण्याची गरज आहे. नागरिकांनी सामाजिक अंतर, सॅनिटायझर, आणि मास्क ही त्रीसूत्री पाळणे बंधनकारक आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यास वेळ लागणार नाही. महापौर दयाशंकर तिवारी, आयुक्त राधाकृष्णन बी. आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी नागरिकांना कोव्हिड संदर्भात असलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केले आहे. नागरिकांनी स्वत:चे लसीकरण तातडीने करवून घ्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

नागपूर मनपा तर्फे पॉझिटिव्हीटी दर कमी करण्यासाठी वेगवेगळया उपाय योजना केल्या जात आहे. मनपा तर्फे आतापर्यंत नागपूरातील २४ लाख जनसंख्ये पैकी २० लाख लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी सांगितले की मनपा तर्फे कोरोना चाचणी केन्द्रा व्यतिरिक्त मोबाईल व्हॅनच्या माध्यमाने बाजारपेठेत सुपर स्प्रेडर्सची चाचणी करण्यात आली. नागपूर पोलिसांच्या मदतीने विना कारण फिरणा-या नागरिकांची चौकात चाचणी केली गेली. गर्दीचे ठिकाण, कृषी उत्पन्न बाजार समिती कळमना व कॉटन मार्केट मध्ये येणा-या नागरिकांची चाचणी करण्यात आली. ज्यांनी लस घेतली आहे ‍ किंवा जे अगोदर कोरोना बाधित झाले आहे त्यांना वगळून बाकी लोकांनी चाचणी करणे आवश्यक आहे. व्यापारी, व्यावसायिक ठिकाणी काम करणा-या कर्मचा-यांची चाचणी आवश्यक आहे. जास्तीत-जास्त चाचणी करुन कोरोनावर नियंत्रण करु शकतो. नाही तर पॉझिटिव्हीटी दर वाढला तर पुन्हा: निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते, असा सावधगिरीचा इशाराही श्री. जोशी यांनी दिला.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement