Published On : Mon, Aug 19th, 2019

शासकीय निधीतील कामाचे व्हिडिओ सादर करा : पालकमंत्री बावनकुळे

Advertisement

अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करा
मौदा-कामठीत 11 हजारावर शेतकर्‍यांना 67.75 कोटी कर्जमाफ
कर्जमाफीचे पत्र शेतकर्‍यांना पाठवा
मौदा-कामठी उपविभाग आढावा बैठक

नागपूर: शासकीय निधी ज्या शासकीय संस्थांना वितरित केला जातो, त्या निधीतून होणार्‍या सर्व कामाचे व्हिडिओ सादर करा. तसेच नियोजित वेळेत सर्व कामे पूर्ण करा. तूर्तास अपूर्ण असलेली सर्व कामे येत्या 10 ते 15 दिवसात पूर्ण होतील अशा बेताने करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मौदा-कामठी उपविभागातील सर्व अधिकार्‍यांना निर्देश दिले. मौदा व कामठी उपविभागात 11 हजारावर शेतकर्‍यांना आतापर्यंत 67.75 कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे. या सर्व शेतकर्‍यांना कर्जमाफ झाल्याचे पत्र पाठविण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

मौदा-कामठी उपविभागाची बैठक मौदा येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात आज झाली. या बैठकीला उपविभागीय अधिकारी, माजी जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, मौदा न.प.च्या अध्यक्ष भारती सोमनाथे, टेकचंद सावरकर, अनिल निधान, रमेश चिकटे, योगेश वाडीभस्मे, नरेश मोटघरे, सदानंद निमकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री बावनकुळे यांनी एकेका विभागाचा आढावा घेऊन आतापर्यंत शासकीय योजनेच्या झालेल्या कामाची माहिती करून घेतली. यात नाला खोलीकर, पालकमंत्री पांदन रस्ते, कृषी विभाग, कर्जमाफी योजना, पीक विमा, भूमिअभिलेख, पंतप्रधान आवास योजना, समाज कल्याण विभाग, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, जि.प. बांधकाम, राज्य रस्ते, केंद्रीय मार्ग निधीतील रस्ते, आयुष्यमान योजना, उज्जवला गॅस योजना, अंत्योदय, अन्न योजना, महावितरणने केलेली कामे, नाला खोलीकरण, सिंचन योजना, धडक सिंचन विहिरी अशा सर्व कामांची माहिती घेत आढावा घेण्यात आला. दलित वस्त्यांमधील कामांमध्ये कामाच्या दर्जाबाबत समझोता केला जाणार नाही. सर्व कामे ही ठरवून दिलेल्या निकषानुसारच असली पाहिजे, याकडेही पालकमंत्र्यांनी सर्व अधिकार्‍यांचे लक्ष वेधले.

आतापर्यंत शासनाने दिलेल्या निधीतील 80 टक्के काम पूर्ण झाली असून उर्वरित 20 टक्के कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. इतिहासात प्रथमच या विभागाला पालकमंत्र्यांच्या प्रयत्नाने भरपूर निधी प्राप्त झाला. या उपविभागात आतापर्यंत 68 टक्के शेतकर्‍यांना कर्जवाटप करण्यात आले आहे.

सन 2019-20 मध्ये पेंच लाभक्षेत्राशिवाय मौदा तालुक्यात 40 व कामठी तालुक्यात 40 धडक सिचन विहिरींचे आहे. राष्ट्रीय पेयजल योजना व अन्य पाणीपुरवठा योजनाअंतर्गत रनाळा येरखेडा आणि बिडगाव तरोडी या दोन योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. विविध योजनांद्वारे सिंचनाची कामे, जलयुक्त शिवार, नाला खोलीकरण, बंधारे, पाणीपुरवठा योजना यासाठी मोठ्या प्रमाणात निधी शासनाने या उपविगाला उपलब्ध करून दिला आहे.