Published On : Thu, Jul 18th, 2019

“रेन वाटर हारवेस्टिंग” व महिला सुलभ शौचालयाकरीता प्रस्ताव सादर करा : महापौर

Advertisement

नागपूर : नागपूर शहरात सध्या पेयजलाची भीषण समस्या आहे. पावसाने दडी मारल्यामुळे नदी, तलावामध्ये सध्या आवश्यक पाण्याचा साठा उपलब्ध नाही. नुकतेच जलप्रदाय विभागाने शहरात एक दिवसाआड पिण्याचे पाण्याचा पुरवठा करण्यास प्रारंभ केला आहे. दिवसें-दिवस भूजल स्तरामध्ये घट होत आहे. नागपूर महानगरपालिकेने नागरीकांना “रेन वाटर हारवेस्टिंग” चे आवाहन केले आहे.

“रेन वाटर हारवेस्टिंग” ला प्रोत्साहन व पाणी टंचाईवर मात करण्याच्या दृष्टीने महापौर श्रीमती नंदा जिचकार यांनी सर्व नगरसेवकांना त्यांचे प्रभागात महापौर निधीतुन “रेन वाटर हारवेस्टिंग” करण्याची सूचना केली आहे.

त्या अनुषंगाने नगरसेवकांनी आपले प्रस्ताव ३० जूलै २०१९ पर्यंत महापौर कार्यालयात सादर करावा जेणेकरुन त्यामुळे विहीरींचा जलस्तर वाढेल आणी जलसंकटावर मात करण्यास काही प्रमाणात मदत होईल.

तसेच सध्या महिलांकरीता शहरात स्वतंत्र सुलभ शौचालयाची कमतरता आहे. प्रत्येक प्रभागात शौचालयाची निर्मीती केल्यास महिलांना सोयीचे होईल. त्यादृष्टीने सुलभ शौचालयाचे आर्थिक वर्ष २०१९-२०२० मध्ये महापौर निधी अंतर्गत बांधकाम करण्याचे ठरविले आहे.

तरी नगरसेवकांनी “रेन वाटर हारवेस्टिंग” व महिला सुलभ शौचालयाकरीता सर्व मान्य जागेची निवड करुन निवड केलेल्या जागेची यादी व त्याकरीता लागणा-या खर्चाचे प्राकलन तयार करुन ३० जूलै पर्यंत सादर करण्याचे आवाहन नगरसेवक/नगरसेविका यांना केले आहे. अश्याप्रकारे महापौर निधीतुन “रेन वाटर हारवेस्टिंग” व महिलाकरीता सुलभ शौचालयासाठी प्रावधान उपलब्ध करुन देणा-या प्रथम महापौर आहेत. त्यामुळे भूजलस्तर वाढण्यास मदत होईल तसेच महिलांनादेखील सोयीचे होईल.