Published On : Fri, Jul 20th, 2018

नागनदीच्या सौंदर्यीकरणाबाबतचा प्रस्ताव सप्टेंबरपर्यंत सादर करा – महापौर

Advertisement

नागपूर: नागनदीच्या दर्शनी भागातील सौंदर्यीकरणाबाबतचा प्रस्ताव सप्टेंबरपर्यंत महापालिकेला सादर करावा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. महानगरपालिका आणि एफडी फ्रान्स यांच्यात शुक्रवारी (ता.२०) महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली.

यावेळी एनईएसडीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.झेड.सिद्दिकी, नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रामनाथ सोनवणे, उपअभियंता मोहम्मद ईजारईल, पशुचिकित्सक डॉ.गजेंद्र महल्ले, एएफडीचे पी.के.दास, समर्थ दास, सिबिला, जेसिक्स प्रामुख्याने उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिका, एएफडी फ्रान्स यांच्या साहाय्याने नाग नदीच्या दर्शनी भागाचे सौंदर्यीकरणाबाबतचा प्रस्ताव तयार करणार आहे. नागनदीच्या काठावरील 15 मीटर भागात नो डेव्हलपमेंट झोन तयार करण्यात येणार आहे. नागनदीच्या काठावर राहणा-या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसनासाठी एएफडी फ्रान्स हे सहकार्य करणार असून या कामासाठी येणा-या खर्चाला त्यांनी या बैठकीत मान्यता दिली. नाग नदीच्या काठावर राहणा-या अन्य घरे, संस्थाने, दुकाने यांचे पुनर्वसन महापालिका करणार असल्याची माहिती या प्रकल्पाचे प्रमुख मोहम्मद ईजराईल यांनी दिली.

एएफडी फ्रान्स या प्रकल्पाअंतर्गत घरे, शैक्षणिक व्यवस्था, पर्यावरणीय व्यवस्था यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. नागनदीमध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा, द्रव पदार्थ, फॅक्टरी वेस्ट टाकले जाणार नाही याबाबत मनपाने नवे धोरण तयार केले आहे. या धोरणाची अंमलबजावणी या प्रकल्पाअंतर्गत केली जाणार आहे. एफडी ही संस्था फ्रान्स सरकार कडून मनपाला कर्ज मिळवून देण्याकरिता सहकार्य करणार असल्याची माहिती मोहम्म्द ईजारईल यांनी दिली.