Published On : Tue, Feb 11th, 2020

दिव्यांगांच्या मैदानासंदर्भात तीन दिवसात अहवाल सादर करा : महापौर संदीप जोशी

Advertisement

दिव्यांग कल्याणकारी योजनांच्या कार्यवाहीचा महापौरांनी घेतला आढावा

नागपूर : शहरामध्ये दिव्यांग बांधवांसाठी खेळण्याचे विशेष क्रीडा मैदान निर्माण करणे आवश्यक आहे. दिव्यांगांसाठी विशेष क्रीडा मैदानाची निर्मीती झाल्यास अनेक दिव्यांग खेळाडूंना सरावासाठी हक्काची जागा उपलब्ध होईल. यासंदर्भात मनपा क्रीडा अधिका-यांनी जागेची पाहणी करून तीन दिवसात अहवाल सादर करावा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

नागपूर महानगरपालिकेमध्ये अपंगांसाठी राखीव निधीतून दिव्यांग कल्याणकारी योजना राबविण्याबाबत महापौरांच्या अध्यक्षतेत गठीत समितीची बैठक सोमवारी (ता.१०) मनपा मुख्यालयातील महापौर कार्यालयातील सभागृहात घेण्यात आली. बैठकीत समितीचे अध्यक्ष महापौर संदीप जोशी यांच्यासह उपायुक्त निर्भय जैन, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, आरोग्य उपसंचालक डॉ. भावना सोनकुसळे, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, कार्यकारी अभियंता (स्लम) राजेंद्र रहाटे, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, सहायक आयुक्त (सा.प्र.वि.) महेश धामेचा, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, स्थावर अधिकारी राजेंद्र अंबारे, अभिजीत राउत आदी उपस्थित होते.

बैठकीत दिव्यांगांच्या योजना सुरळीतपणे चालविण्याकरिता व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता मनपात स्वतंत्र दिव्यांग कक्ष निर्माण करणे व त्याकरिता आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध करणे, दिव्यांगांसाठी नागपूर शहरात विशेष क्रीडा मैदानाची निर्मितीकरीता मैदान उपलब्ध करणे, दिव्यांगांसाठी म्यूजिक थेरेपी केंद्र सुरू करणे, शहरात दिव्यांगांना व्यवसायाकरिता जागा उपलब्ध करण्याबाबत प्रगती अहवाल, मनपाच्या १० झोन अंतर्गत समुपदेशन केंद्र सुरू करण्याकरिता झोनमध्ये जागा उपलब्ध करून देणे, पंतप्रधान आवास योजने अंतर्गत लकी ड्रॉ मध्ये निवड झालेल्या दिव्यांगांना ५० निधी उपलब्ध करून देण्याकरीता झालेल्या कार्यवाहीचा प्रगती अहवाल आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

नागपूर शहरात दिव्यांगांच्या योजना सुरळीतपणे चालविण्याकरिता व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता मनपातर्फे यशवंत स्टेडियम येथील सभागृहात म्यूजिक थेरेपी केंद्र आणि दिव्यांग समुपदेशन केंद्र सुरू करण्याची संकल्पना यावेळी मांडण्यात आली. समुपदेशन केंद्र आणि येथे समुपदेशकाची नियुक्ती करण्यासंबंधी कार्यवाहीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.

शहरात दिव्यांगांना व्यवसायाकरिता जागा उपलब्ध जागांचा यावेळी महापौरांनी झोननिहाय आढावा घेतला. आतापर्यंत सहा झोनमधून जागांच्या उपलब्धतेचे अर्ज प्राप्त झाले आहेत. इतर झोनमधील उपलब्ध जागांचा अहवाल येत्या ७ दिवसांत सादर करण्याचे महापौर संदीप जोशी यांनी निर्देशित केले.

दिव्यांगांसाठी विशेष उद्यान निर्मिती व इतर उद्यानात विशेष उपकरणे उपलब्ध करून देण्याच्या विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली. शहरातील ४ उद्यानांतील काही जागा दिव्यांगांसाठी विकसीत करून तिथे विशेष उपकरणे उपलब्ध करण्याबाबत निविदा प्रक्रिया सुरू आहे. संबंधित कार्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे मंजुरीकरीता पाठविण्यात आल्यानंतर ते सभागृहात सादर करण्यात येईल, अशी माहिती यावेळी उद्यान विभागातर्फे देण्यात आली.