Published On : Tue, Feb 11th, 2020

मनपाच्या प्रत्येक झोनमध्ये स्वतंत्र फवारणी गाडी

नव्या पाच गाड्यांना महापौरांनी दाखविली हिरवी झेंडी

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या प्रत्येक झोनमध्ये आता स्वतंत्र धूर फवारणी गाडी मिळणार आहे. मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागामार्फत पाच नवीन फवारणी गाड्या मनपाच्या सेवेमध्ये दाखल करण्यात आल्या आहेत. या गाड्यांना सोमवारी (ता.१०) महापौर संदीप जोशी यांनी हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण केले.

याप्रसंगी सत्तापक्ष नेते संदीप जाधव, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, नगरसेवक हरीश दिकोंडवार, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आरोग्य उपसंचालक डॉ.भावना सोनकुसळे, हिवताप व हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे, हत्तीरोग अधिकारी दिपाली नासरे आदी उपस्थित होते.

डेंग्यू, मेलेरिया, फायलेरीया यासारख्या आजारांपासून संरक्षणासाठी मनपातर्फे वस्त्यांमध्ये फवारणी केली जाते. दाट वस्त्यांमध्ये छोट्या मशीनद्वारे फवारणी केली जाते. मोठ्या वस्त्यांमध्ये फवारणी करीता यापूर्वी पाच फवारणी गाड्या मनपामध्ये दाखल करण्यात आल्या होत्या. दोन झोन मिळून एक गाडीद्वारे फवारणी केली जात होती. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक झोनमध्ये स्वतंत्र फवारणी मशीन असावी, याकरीता पाच नवीन फवारणी गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रत्येक झोनला स्वतंत्र फवारणी गाडी उपलब्ध झाली आहे.

‘रिमोल कंट्रोल’ गाडी
इंडो फॉगच्या सहकार्याने मनपाच्या आरोग्य सेवेमध्ये दाखल झालेल्या फवारणी गाड्या ‘रिमोट’द्वारे नियंत्रित केल्या जातात. मशीन हाताळणीसाठी मनुष्यबळाची आवश्यकता नसून चालकच ‘रिमोट’द्वारे मशीनने फवारणी करू शकतो. १३० लीटर डिझेल तर ६ लीटर पेट्रोल क्षमतेची फवारणी मशीन आहे. डिझेलमध्ये औषध मिश्रीत करून त्याची फवारणी केली जाते, अशी माहिती हिवताप व हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे यांनी यावेळी दिली.