Published On : Thu, Jun 27th, 2019

विद्यार्थ्यांनी यशोशिखर गाठून नावलौकिक मिळवावा- उपसभापती बाळू गवते

कामठी :-विद्यार्थ्यांनी जोमाने अभ्यास करून यशोशिखर गाठावे व गावाचा नावलौकिक वाढवावा असे मौलिक प्रतिपादन कामठी पंचायत समितीचे उपसभापती देवेंद्र उर्फ बाळू गवते यांनी केले.आमच्या परिसरातील विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडो या उदार हेतूने भिलगाव येथील यशोधरा लॉन येथे ‘एज्युकेशनल हब ‘च्या माध्यमातून दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करियर मार्गदर्शन सोहळा आयोजित कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला .यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिलगाव ग्रा प चे माजी सरपंच मोहन माकडे, प्रमुख पाहुणे म्हणून उमरावजी माकडे, डॉ अनुप पाहुणे, डॉ अमित शर्मा,सचिन नायडू, सुरज येरखेडे,योगेश वारकर,रवि कुहीटे, सुदर्शन भोयर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. मार्गदर्शन करताना उपसभापती बाळू गवते म्हणाले की विद्यार्थ्यांनी यश मिळविण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती निर्माण करणे गरजेचे आहे .स्वतःची क्षमता विकसित करण्यासाठी स्वतःलाच परिश्रम घ्यावे लागतील तेव्हाच यश पदरी पडेल .विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण व एकाग्रतेने अभ्यास करून यश मिळवावे असेही त्यांनी सांगितले.

यावेळी दहावी बारावीच्या परीक्षेत प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सम्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच उज्वल भविष्याच्या शुभेच्छा देत करियर मार्गदर्शन करण्यात आले .यावेळी उपस्थित विद्यार्थ्याचे मनोबल मजबूत होत त्यांना सकारात्मक ऊर्जा मिळाली.कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून कार्यक्रमात मोठ्या संख्येत विद्यार्थी व पालकांनी उपस्थिती दर्शविली होती .कार्यक्रमाचे संचालन व आभार खोजेंद्र माकडे यांनी मानले असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एज्युकेशनल हब च्या पदाधिकारी व सदस्यांनी मोलाची भूमिका साकारली.


संदीप कांबळे कामठी