Published On : Thu, Jun 27th, 2019

गुंगीची औषधी देऊन प्रवाशांना लुटनारी टोळी गजाआड

Advertisement

सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त, लोहमार्ग पोलीसांचे यश

नागपूर : प्रवाशांना शितपेयात गुंगीचे औषधी देऊन लुटपाट करणाºया टोळीला अटक करण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. मनोज सिंग (२२) व कन्हैय्या यादव (२३, दोन्ही रा. गोंडा,उत्तरप्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या टोळीतील तिसरा आरोपी सोनू शुक्ला (२४) हा आधीपासूनच लोहमार्ग पोलिसंच्या ताब्यात आहे. या आरोपींजवळून जवळपास सव्वा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दोघेही धावत्या रेल्वेत पोलिसांच्या तावडीतून फरार झाले होते. त्यांच्या विरूध्द विविध रेल्वे स्थानकावर आठ ते दहा गुन्ह्यांची नोंद आहे.

Advertisement

अखिल दाधोरे (३४, रा़ सिकंदराबाद) व अशोक राणा (रा़ कलबुर्गी) हे दक्षिण एक्सप्रेसमधून २० मे रोजी प्रवास करत होते़ त्याच रेल्वेत मनोज, कन्हैया व सोनूू यांनी बनावट नावाने रेल्वे तिकिटा मिळवून प्रवास केला़ आरोपींनी अखिल, अशोक व अन्य प्रवाशांसोबत परिचय करून त्यांच्यासोबत मैत्री केली आणि रात्रीच्या वेळेस शितपेयाच्या दोन बाटल्या घेऊन त्यातील एका बॉटलमध्ये गुंगी येणाºया गोळ्या मिसळून ती बॉटल मैत्री केलेल्या प्रवाशांना पिण्याकरिता दिली़ बल्लारशा स्थानकावरून गाडी निघताच प्रवाशांनी शितपेय घेतल्यानंतर त्यांना गुंगी आली, पाहता पाहता त्यांची शुध्द हरपली. या संधीचा फायदा घेत मनोज, कन्हैया व सोनू या तिघांनीही प्रवाशांजवळील पैशाचे पाकीट, एटीएम, रोख रक्कम व मोबाईलवर हात साफ केला आणि चंद्रपूर रेल्वेस्थानकावर उतरून पसार झाले़

फिर्यादी दाधोरे व राणा यांनी तक्रार दिल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. चंद्रपूर येथील ज्या एटीएममधून त्यांनी पैसे काढले तेथील सीसीटीव्हीमधून त्यांचे छायाचित्र मिळविण्यात आले. त्या आधारे वर्धा लोहमार्ग पोलिस त्यांचा शोध घेत होते. विजयवाडा रेल्वे स्थानकावर हे तिन्ही आरोपी सापडताच त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. मात्र, त्यातील मनोज सिंग हा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. आरोपी उत्तरप्रदेशाती गोंडा जिल्ह्याचे असले तरी ते दिल्लीत राहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे फरार मनोजच्या शोधासाठी पोलिस कन्हैय्याला घेऊन दिल्लीला गेले.

तेथे मनोज पोलिसांच्या हाती लागला. मनोज व कन्हैय्या यांना रेल्वेने वर्धा येथे आणत असतानाच तिगाव रेल्वे स्थानकाजवळ दोन्ही आरोपी पोलिसांची नजर चुकवून पळून गेले होते. त्यामुळे पुन्हा एकदा युद्धस्तरावर त्यांचा शोध लोहमार्ग पोलिसांनी सुरू केला होता. शेवटी जयपूर येथे या दोन्ही आरोपींना पकडण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले. धानेपूर, बाराबंकी, बंगलोर येथेही त्यांनी अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे तपासात लक्षात आले आहे. त्यांच्याजवळून १ लाख २३ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास वर्धा लोहमार्ग पोलिस करीत आहेत.