Published On : Sun, Feb 11th, 2018

विद्यार्थ्यांनी राष्ट्राच्या उन्नतीसाठी योगदान देण्यासाठी सज्ज रहावे – राज्यपाल चे. विद्यासागर राव

Advertisement

नांदेड:- विद्यार्थ्यांनी राष्ट्राच्या उन्नतीसाठी देता येईल, ते योगदान देण्यासाठी सदैव सज्ज रहावे. सत्यनिष्ठा आणि देशाप्रती जाणीव जागृत ठेऊन काम केल्यास स्वतः बरोबरच राष्ट्राची प्रगती साधता येईल. तसेच कोणत्याही प्रकारचा जाती, धर्म, पंथ व भेदभावाचा विचार न करता समता, बंधुता आणि एकता या तत्त्वाप्रती तसेच माता-पित्यांप्रती आदर ठेवावा, असे आवाहन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विसाव्या दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन केले.

विद्यापीठाच्या प्रांगणात दीक्षांत प्रदानाचा शानदार समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून साईंटिफिक ॲडव्हायजरी ग्रुप, सोशल बिहेविअरल रीसर्च डिव्हीजन, आयसीएमआरचे अध्यक्ष तथा सुप्रसिद्ध मानवविज्ञान शास्त्रज्ञ प्रा. रामचंद्र मुटाटकर, कुलगुरू डॉ. पंडीत विद्यासागर, प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे, कुलसचिव डॉ. रमजान मुलानी, परीक्षा मुल्यमापन व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे, व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषद, अधिसभा तसेच विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, अप्पर विभागीय आयुक्त विजयकुमार फड, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, मनपा आयुक्त गणेश देशमुख, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

Advertisement

दीक्षांत भाषणात बोलताना डॉ. मुटाटकर म्हणाले की, भारतीय विद्यापीठाने स्वतंत्र आणि एकमेकांच्या सहाय्याने सर्व मानवी समस्यांचे निराकरण करण्याची भुमिका घेतली पाहिजे. महाविद्यालयीन व विद्यापीठातील शिक्षकांनी युजीसीच्या निर्देशाप्रमाणे शिक्षण आणि संशोधन केले पाहिजे. विज्ञान शाखेने उद्योगाशी निगडीत संशोधन तर मानव्य विद्याशाखा आणि सामाजिक शास्त्रे यांनी समाज उपयोगी उपक्रमात सहभाग देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये आपण समाजाचे देणे लागतो ही धारणा प्रबळ होणे गरजेचे आहे. अशा परस्पर उपक्रमातून मानवी जीवन समृद्ध होऊ शकते व ते आंतर विद्याशाखीय पद्धतीतून शक्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

समकालीन प्रश्नांचा विचार आणि सोडवणूक ही बहुविद्याशाखा आणि आंतर विद्याशाखा संशोधनातून साधता येईल. शेतकरी आत्महत्या या केवळ आर्थिक विवंचनेतून होत नसून त्यास राजकीय संदर्भ सुद्धा आहे. तसेच या आत्महत्याची पार्श्वभूमी सांस्कृतिक देखील आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच किल्लारी येथील भुकंपग्रस्त लोकांनी सर्व समस्यांना खंबीरपणे तोंड दिले परंतू आत्महत्या केली नाही. तर तात्कालीन दारिद्रयामुळे शेतकरी आत्महत्या करतो. या मागील मानसीकता समजून घेतली तरच या समस्यांचे निराकरण करता येईल, असे डॉ. मुटाटकर यांनी स्पष्ट केले.

कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी विद्यापीठापुढे गुणवत्ता वाढ, उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयकरण, नवीन अध्ययन आणि अध्यापन पद्धतीचा अवलंब करणे अशी अनेक आव्हाने उभी असल्याचे सांगुन 20 वर्षांच्या कालावधीत राष्ट्रीय मुल्यांकन तथा अधिस्वीकृती परिषद (नॅक) चा अ दर्जा मिळविणाऱ्या या विद्यापीठाने गेल्या एक वर्षांच्या कालावधीत अनेक आव्हानात्मक निर्णय घेऊन ते यशस्वीपणे राबविले आहेत. पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर निवडीवर आधारीत श्रेयांक पद्धत राबविणारे महाराष्ट्रातील हे पहिले विद्यापीठ असल्याचे सांगितले. तसेच केंद्र शासनाने गुरु गोविंदसिंघजी अध्यासन संकुल व संविधान केंद्रास नुकतेच 22 कोटी रुपये अध्यासनासाठी मंजूर केले आहेत. तर रुसा अंतर्गत पायाभुत सुविधांसाठी 20 कोटी रुपये प्राप्त झाले असून पुढील तीन वर्षांच्या कालावधीत शंभर कोटीचे अनुदान ग्राह्य धरण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. शिक्षण, संशोधन, विद्यार्थी आणि मुलभुत सुविधांचा विकास याबाबत विद्यापीठाने केलेल्या भरीव कामगिरीची माहिती त्यांनी दिली.

प्रारंभी विद्यापीठाच्या प्रांगणातून दीक्षांत मिरवणुकीतून मान्यवरांचे दीक्षांत समारंभाच्या व्यासपीठावर आगमन झाले. एमजीएम महाविद्यालयाच्या चमूने विद्यापीठ गीत सादर केले. कुलपती तथा राज्यपाल श्री. विद्यासागर राव यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन तसेच स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विविध विद्याशाखांतील विषयनिहाय सुवर्ण पदकांचे मानकरी ठरलेल्या 46 विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. तर 236 विद्यार्थांना पीएचडी व पदवी प्रदान करण्यात आली. विविध विद्याशाखांच्या अधिष्ठातांनी कुलपती महोदयांना स्नातकांना पदवी प्रदान करण्यासाठी सादर केले. या समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. माधुरी देशपांडे व डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले.

इनडोअर स्पोर्ट स्टेडीअमचे उद्घाटन

प्रारंभी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रांगणातील इनडोअर स्पोर्ट स्टेडीअमचे उद्घाटन करण्यात आले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement