Published On : Sun, Feb 11th, 2018

समाजाच्या शाश्वत आरोग्यासाठी शासन प्रयत्नशील – केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा

Advertisement

लातूर:- आरोग्याच्या सुविधा विषयक केलेले कार्य हे चिरकाल टिकणारे कार्य असून व्यक्तीला आजारातून मुक्त करण्याबरोबरच भविष्यात आजारच उद्भवू नयेत यासाठी केंद्रशासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी केले.

विवेकानंद कॅन्सर रुग्णालयात कर्करोगावरील अत्याधुनिक उपचार यंत्र लिनिअर ॲक्सलरेटरच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी श्री. नड्डा बोलत होते. यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार सुनील गायकवाड, माजी खासदार गोपालराव पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलींद लातूरे, महापौर सुरेश पवार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, विवेकानंद संस्थेचे डॉ. अशोक कुकडे, डॉ. कैलाश शर्मा आदी उपस्थित होते.

केंद्रीय आरोग्य मंत्री श्री. नड्डा म्हणाले की, कर्करोगासारख्या दुर्धर आजाराचे वेळीच निदान झाले तर तो अल्पकाळातच बरा होऊ शकतो. त्यासाठी केंद्र व राज्य शासन विविध उपाययोजना करीत आहे. तसेच देशातील लोकांचे शाश्वत आरोग्य हे समाजासाठी व देशासाठी हितकारक असून रोग होण्याआधी रोगाचे निदान होणे गरजेचे आहे. केंद्र शासनामार्फत देशातील नागरिकांसाठी विविध आरोग्यदायी योजनांची अंमलबजावणी तत्परतेने केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

केंद्र सरकारकडून महाराष्ट्रामध्ये 7 सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल होत आहेत. तर देशात एकूण होत असलेल्या 20 राज्य कॅन्सर हॉस्पीटलपैकी एक असलेल्या औरंगाबाद येथील राज्य कॅन्सर हॉस्पीटलच्या इमारतीचे भूमीपूजन आज झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लवकरच नागपूर येथे ऑल इंडिया मेडिकल सायन्सेसची स्थापना होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

देशातील एकूण 1 लाख 50 हजार उपकेंद्रामध्ये 0 ते 30 वर्षपर्यंतच्या वयोगटातील सर्व नागरिकांची प्राथमिक तपासणी करुन सर्वांना होणाऱ्या आजाराची माहिती करुन दिली जाणार आहे. तसेच ‘जंत मूक्त भारत’ या उपक्रमामध्ये शिक्षकांद्वारे दर सहा महिन्याला शाळेतील बालकांना ‘अल्बेंडाझॉलची’ गोळी दिली जाणार आहे. त्यामुळे लहान मुलांचा शारीरिक, मानसिक व बौध्दीक विकास होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘आयुष्यमान भारत’ या अभियानातून देशातील 10 कोटी परिवारांना 5 लाख रुपयांचा जीवन विमा दरवर्षी देण्यात येणार आहे. मॉ (MAA) या योजनेंतर्गत नवजात बालकास 6 महिन्यांपर्यंत आईचे दुध पाजण्याचे प्रोत्साहन देण्यात येणार आहे. क्षयरोग सन 2025 पर्यंत समूळ नष्ट करण्याचे उद्दीष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी श्री. नड्डा यांनी विवेकानंद कॅन्सर हॉस्पीटलच्या कार्याचा गौरव करताना पंतप्रधान डायलिसीस योजनेंतर्गत डायलीसीसची सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे सूचित केले.

पालकमंत्री श्री. निलंगेकर यावेळी आपल्या मनोगतात म्हणाले की, लातूरला या महिन्यात मंजूर झालेल्या रेल्वे बोगीचा कारखाना, नीटचे परीक्षा केंद्र व लिनिअर ॲक्सलरेटर या अत्याधुनिक उपकरणामुळे लाभ होणार असून या लिनिअर ॲक्सलरेटर सुविधेमुळे कॅन्सरग्रस्त रुग्णांना मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी महात्मा फुले आरोग्य योजना, यासारख्या विविध आरोग्यदायी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

खासदार सुनील गायकवाड म्हणाले की, लिनिअर ॲक्सलरेटर या अत्याधुनिक उपरणाचा मराठवाड्यामधील जनतेला तसेच आंध्र प्रदेश, कर्नाटक येथील जनतेलाही याचा फायदा होणार आहे. प्रारंभी केंद्रीय आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते लिनिअर ॲक्सलरेटर या अत्याधुनिक उपकरण विभागाचे फीत कापूण व दिपप्रज्वलन करुन लोकार्पण झाले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. प्रमोद टिके यांनी केले तर आभार डॉ. अरुणा देवधर यांनी मानले.