Published On : Sun, Feb 11th, 2018

महिला उद्योजिका भविष्यात होणार ‘बिझनेस लीडर’ – अमृता फडणवीस

Advertisement

नागपूर: महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे येत आहेत. आता छोटे छोटे उद्योग करणा-या महिला उद्योजिका भविष्यात ‘ बिझनेस लीडर’ म्हणून ओळखल्या जातील, असे प्रतिपादन अक्सिस बॅंकेच्या उपाध्यक्षा श्रीमती अमृता फडणवीस यांनी केले.

नागपूर महानगरपालिका, समाजकल्याण विभाग, महिला व बालकल्याण विभाग तर्फे रेशीमबाग मैदानावर आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याच्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार होत्या. पुढे बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, जी महिला घरी राहते, मुला बाळांना सांभाळते तिने बाहेर पडावे. आपल्यात कौशल्य समोर आणावे, तिची प्रगती नक्कीच होईल. उद्योग करताना महिलांना मार्केटिंग, सामाजिक यासारख्या अनेक समस्या समोर येतात. मात्र महिलांनी या सर्व समस्यांवर मात करून उद्योग क्षेत्रात भरारी घेतली. यामुळे देशाचा जीडीपी वाढतो आहे. स्त्री आणि पुरूष ही दोन्ही चाके सुदृढ नसेल तर देशाची प्रगती होऊ शकत नाही, असे म्हणत महिला उद्योजिकांना बाजार उपलब्ध करून दिल्याबद्गल नागपूर महानगरपालिकेचे कौतुक केले.

समारोपीय कार्यक्रमाला व्यासपीठावर सत्तापक्ष नेता संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, हनुमाननगर झोन सभापती भगवान मेंढे, नगरसेविक पिंटू झलके, महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, समिती सदस्या दिव्या धुरडे, वंदना भगत, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, हनुमाननगर झोन सहायक आयुक्त राजू भिवगडे उपस्थित होते.

प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वर्षा ठाकरे यांनी प्रास्ताविकातून महिला उद्योजिका मेळाव्यामागील भूमिका विषद केली. कार्यक्रमाचे संचालन किशोर गलांडे यांनी केले. आभार उपायुक्त डॉ.रंजना लाडे यांनी मानले.

लाडली लक्ष्मी योजनेच्या पॉलिसीजचे वाटप

नागपूर महानगरपालिका समाजकल्याण विभागाच्यावतीने लाडली लक्ष्मी योजनेअंतर्गत आतापर्यंत शुन्य ते एक वर्षा वयोगटातील ६९० मुलींची पॉलिसी काढण्यात आली आहे. मुलींच्या उच्च शिक्षणाच्या दृष्टीने काढण्यात आलेल्या या पॉलिसीजचे प्रीमिअम मुलीच्या २० वर्षापर्यंत मनपा भरणार आहे. यातील ११ मुलीच्या पालकांना पॉलिसजचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. यामध्ये निक्षिता सोनकुसरे, नसिका नितनवरे, आराध्या बारापात्रे, शर्वरी दुधलकर, शीतल सिडाम, रूही ठवकर, प्रत्यक्षी लाहूलकर, अंजली खंडाळे, युक्ती खैरकर, प्रार्थना निनावे, नमिता माटे यांचा समावेश आहे.

उत्कृष्ट स्टॉलधारकांचा सत्कार

महिला उद्योजिका मेळाव्यातील उत्कृष्ट १० स्टॉलधारकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये अलिबाग प्रगती महिला बचत गट, माजी सैनिक महिला बचत गट, सुषमा कांबळे, पूजा बचत गट, सुनिता महिला बचत गट, प्रियंका सतपाल, जयधनलक्ष्मी बचत गट, वैष्णवी जेठे आणि विदर्भ पशू उन्नती गट यांचा समावेश होता.

‘आरोही’तून मराठी हिंदी गीतांची मेजवानी

समारोपीय कार्यक्रमानंतर रसिक श्रोत्यांसाठी आरोही या मराठी हिंदी गीत संगीताच्या कार्यक्रमाची मेजवानी ठेवण्यात आली. गणेश स्तवन आणि इतनी शक्ती हमे दे ना दाता या गीतांने सुरूवात झालेला कार्यक्रम जुनी हिंदी आणि मराठी गीते, गझल असा उत्तरोत्तर रंगत गेला.