Published On : Thu, May 27th, 2021

उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थी सक्षम असावा : महापौर

मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना टॅबलेटचे वितरण : ना. गडकरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य

नागपूर: मनपा शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असती. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे संपूर्ण शिक्षण पद्धती ऑनलाईन झाली. मात्र, मनपा शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेणे बेताचेच होते. किमान दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये. उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थी सक्षम असावा याकरिता विद्यार्थ्यांना टॅबलेट देण्याचा निर्णय मनपाच्या शिक्षण समितीने घेतला. हा निर्णय आज प्रत्यक्ष रूपात उतरल्याचा आनंद असल्याचे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने मनपाद्वारे संचालित शाळांमध्ये दहावी व बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात टॅबलेट वितरण करण्यात आले. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाला उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समितीचे सभापती प्रमोद तभाने, स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती राजेंद्र सोनकुसरे, जलप्रदाय समितीचे सभापती संदीप गवई, शिक्षण समितीच्या उपसभापती सुमेधा देशपांडे, सदस्य संगीता गिऱ्हे, परिणिता फुके, मो. इब्राहिम टेलर, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, माजी सत्तापक्ष नेते संदीप जाधव, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ना. गडकरी हे स्वत: हुशार विद्यार्थी होते. त्यांनी अथक परिश्रम घेतले. म्हणूनच ते जागतिक स्तरावर गणमान्य झाले. कोरोना काळात त्यांनी नागपूरला ऑक्सिजन मिळविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. रेल्वे, हवाई मार्गाने नागपुरात ऑक्सिजन आले. ‘गडकरी मॉडेल’ म्हणून ते देशभरात ओळखले जाऊ लागले. अशा केंद्रीय नेतृत्वाच्या वाढदिवशी मनपा शाळांच्या विद्यार्थ्यांना टॅबलेट देणे हा दुग्धशर्करा योग असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

प्रास्ताविकातून शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी विद्यार्थ्यांना टॅबलेट देण्यामागील भूमिका विषद केली. इतर शाळांच्या तुलनेत मनपाच्या शाळांमध्ये सुविधा नाहीत, अशी भावना विद्यार्थ्यांच्या मनात येऊ नये म्हणून दरवर्षी विद्यार्थ्यांना काही ना काही देण्याचा पायंडा आम्ही पाडला. पहिल्या वर्षी सायकल, दुसऱ्या वर्षी स्वेटर, बूट, मोजे आणि यावर्षी टॅबलेट देऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या दृष्टीने सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे एक चांगले वातावरण तयार झाले असून निकालात कमालीची सुधारणा झाल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.

यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात पाच विद्यार्थ्यांना टॅबलेट वाटप करण्यात आले. वैष्णवी पाऊलझगडे (जयताळा मनपा मराठी माध्यमिक शाळा), कलश श्रीवास (वाल्मिकीनगर मनपा हिंदी माध्यमिक शाळा), मो. तालीब मो. रज्जन (एम.ए.के. आझाद मनपा उर्दु माध्यमिक शाळा), संध्या देवेंद्र महिपाल (संजयनगर मनपा हिंदी माध्यमिक शाळा) आणि कु. अदिबा फातमा शफुद्दीन शेख (जी.एम. बनातवाला मनपा इंग्रजी माध्यमिक शाळा) या विद्यार्थ्यांना महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते टॅबलेट वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सुभाष उपासे यांनी केले. आभार शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र सुके, संजय दिघोरे, विनय बगले यांनी सहकार्य केले.