Published On : Mon, Jan 6th, 2020

विद्यार्थीही आता म्हणतील, ‘मम्मी पापा यू टू’

Advertisement

नागपूर महानगरपालिका, शालेय शिक्षण विभाग, पोलिस वाहतूक विभागाचे संयुक्त अभियान १३ ते १९ जानेवारीदरम्यान

नागपूर: विद्यार्थी आई-वडिलांच्या अनुकरणातून अनेक गोष्टी शिकतात. यालाच संस्कार म्हणतात. आई-वडिलांकडून एखादी चुकीची गोष्ट घडत असेल तर भावी पिढीही तशीच घडते. आता हे टाळण्यासाठी विद्यार्थ्यांवर स्वचछतेचे संस्कार रुजविण्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि वाहतूक पोलिस विभागाच्या वतीने ‘मम्मी पापा यू टू’ हे अभियान १३ ते १९ जानेवारीदरम्यान नागपूर शहरात राबविण्यात येणार आहे. ही माहिती महापौर संदीप जोशी यानि दिली या वेळी उपमहापौर मनीषा कोठे, विक्की कुकरेजा, अतिरिक्त आयुक्त राम जोशी उपस्तित होते.

विद्यार्थी केंद्रबिंदू असलेल्या या अभियानाच्या माध्यमातून आई-वडिलांना स्वच्छतेचा संदेश देत जनजागृती करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे याच दरम्यान वाहतूक सुरक्षा सप्ताह असल्याने स्वच्छतेसोबतच वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणीबाबतही जनजागृती करण्यात येणार आहे. आई-बाबा, रस्त्यावर कचरा टाकू नका, ओला आणि सुखा कचरा विलग करूनच द्या, हेल्मेट घालूनच गाडी चालवा, उलट्या दिशेने गाडी चालवू नका असे म्हणत आई-बाबांना विद्यार्थी विनवणी करणार आहे.

अभियानाचा उद्देश
विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून ‘मम्मी पापा यू टू’ हे अभियान संपूर्ण नागपूर शहरात राबविण्याचा उद्देश स्वच्छतेसाठी लोकसहभाग वाढविणे हा आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी मनावर संस्कार घडविण्यासोबतच नागरिकांमध्ये स्वच्छता आणि वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करणे, हा आहे. या अभियानाच्या माध्यमातून विविध स्पर्धा घेण्यात येणार असून रस्त्यावर उतरूनही नागरिकांना स्वच्छता आणि वाहतूक नियम पाळण्याबाबत आवाहन करण्यात येणार आहे.

अभियानासंदर्भात लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी संस्थांसोबत बैठक
‘मम्मी पापा यू टू’ या अभियानासंदर्भात लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी संस्थांसोबत सोमवारी (ता.६) मनपाच्या राजे रघुजी भोसले नगर भवन येथे घेण्यात आली. बैठकीमध्ये महापौर संदीप जोशी, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, बसपा गटनेत्या वैशाली नारनवरे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्यासह नगरसेवक व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीमध्ये ‘मम्मी पापा यू टू’ अभियानासंदर्भात लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी संस्थांना माहिती देण्यात आली. अभियानामध्ये नगरसेवकांची व स्वयंसेवी संस्थांची भूमिका काय असेल, यावरही चर्चा करण्यात आली.

सात दिवस भरगच्च स्पर्धा आणि उपक्रम
‘मम्मी पापा यू टू’ हे अभियान १३ ते १९ जानेवारी २०२०दरम्यान राबविण्यात येणार असून सात दिवस विद्यार्थी आणि नागरिकांसाठी भरगच्च उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

यापूर्वी ८ जानेवारी २०२० ला सकाळी ८.३० ते १० वाजता या वेळेत रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये शहरातील सर्व मुख्याध्यापकांची सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेमध्ये शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे कार्यक्रमाची रूपरेषा विषद करतील. यावेळी जनआक्रोष संस्थेद्वारे वाहतूक नियमांबाबत तर जुही पांढरीपांडे यांच्यामार्फत प्लॉस्टिक बंदीबाबत सादरीकरण केले जाईल. बैठकीत शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे व महापौर संदीप जोशी मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाचे संचालन मनपा शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर करतील.

११ जानेवारी २०२०ला सकाळी ९ वाजता शहरातील सर्व शाळांमध्ये पालक सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेमध्ये ‘मम्मी पापा यू टू’ या अभियानाबाबत उपस्थित पालकांना माहिती देण्यात येणार आहे. यावेळी परिसरातील नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण तज्ज्ञ यांच्यामार्फत मार्गदर्शन करण्यात येईल. याप्रसंगी स्वच्छतेबाबत सादरीकरण, व्हिडिओ क्लिप, पोस्टर्स दाखविण्यात येणार असून वाहतुकीच्या नियमाबाबत जनजागृती केली जाणार आहे.

१३ जानेवारी २०२०

· शालेय विद्यार्थ्यांसाठी घोषवाक्य स्पर्धा

· इयत्ता ५ ते ८ आणि इयत्ता ९ ते १२ दोन गटात स्पर्धा

१४ जानेवारी २०२०

· स्वच्छ नागपूर, सुंदर नागपूर’ या विषयावर पथनाट्य स्पर्धा

· इयत्ता ५ ते १२ विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा

१५ जानेवारी २०२०

· मकर संक्रांतीमुळे अभियानाला सुटी असेल

१६ जानेवारी २०२०

· ‘शहर स्वच्छता ही फक्त महापालिकेची जबाबदारी आहे’ या विषयावर वादविवाद स्पर्धा

· पालकांसाठी ‘स्वच्छ नागपूर, सुंदर नागपूर’ या विषयावर रांगोळी स्पर्धा

१७ जानेवारी २०२०

· सकाळी ८.३० वाजता स्वच्छता आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे संदेश असलेले फलक घेउन शालेय विद्यार्थ्यांमार्फत शाळा परिसरात मानवी साखळी तयार करण्यात येईल

१८ जानेवारी २०२०

· ‘इंदोर प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर होऊ शकते, नागपूर का नाही? या विषयावर पालकांसाठी निबंध स्पर्धा

१९ जानेवारी २०२०

· सकाळी ९ ते १२ या वेळेत शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा

· वयोगट – ७ ते १२ वर्ष, १३ ते १८ वर्ष, १९ ते ५५ वर्ष व ५५ वर्षाच्या पुढे

· विषय – १. पर्यावरण संवर्धन २. कचरा व्यवस्थापन ३. जागतिक तापमानवाढ ४. बाल व महिला सुरक्षा

· सहकार्य – स्वच्छ असोसिएशन व पगमार्ग नागपूर

· स्थळ – महाराजबाग

*सहभागी होण्याचे आवाहन*

विद्यार्थ्यांवर संस्कार घडविण्याच्या दृष्टीने आणि नागरिकांना स्वच्छतेच्या सवयी लावण्याच्या दृष्टीने आयोजित ‘मम्मी पापा यू टू’ हे अभियान महत्त्वकांक्षी अभियान आहे. यामध्ये शाळा आणि विद्यार्थ्यांच्या पालकांसोबतच संपूर्ण नागरिकांनी सहभागी व्हावे, आपले योगदान या अभियानात द्यावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.