
नागपूर: रस्ते सुरक्षा विषयावर देशभरातील विविध शाळांतील बालचित्रकारांनी सादर केलेल्या चित्रांचा वापर करून ‘जनआक्रोश – फॉर बेटर टुमारो’ या सामाजिक संस्थेने तयार केलेली 2026 ची अनोखी दिनदर्शिका नुकतीच केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली.
2012 पासून रस्ते सुरक्षा क्षेत्रात कार्यरत असलेल्या जनआक्रोश संघटनेने नव्या वर्षासाठी तयार केलेल्या या दिनदर्शिकेचे प्रकाशन खास गडकरी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी जनआक्रोशचे अध्यक्ष प्रकाश खांडेकर, सचिव रवींद्र कासखेडीकर, तसेच संजय डबली, राजाभाऊ वझलवार, ज्ञानेश पाहुणे, सुबोध देशपांडे, दत्ताजी कुलकर्णी आणि प्रशांत मेंढी यांची उपस्थिति होती.
जनआक्रोश संघटना देशभरातील शाळा, महाविद्यालये, कार्यालये, तसेच ट्रॅफिक सिग्नल्सवर रस्ते सुरक्षेबाबत जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवित आहे. तसेच वाहनचालकांसाठी जनजागृतीपर व्याख्याने आयोजित केली जातात. दरवर्षी रस्ते सुरक्षा विषयावर दिनदर्शिका प्रकाशित करण्याचा देखील हा उपक्रम आहे.
या वर्षीच्या दिनदर्शिकेबाबत बोलताना सचिव रवींद्र कासखेडीकर म्हणाले, “लहानपणापासून मुलांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्याची जबाबदारी रुजावी, या हेतूने आम्ही देशभरातील शालेय विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षेबाबत चित्रे काढण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून नागपूर, भंडारा, बुलडाणा, यवतमाळ, धुळे, रोहतक, गांधीनगर, इंदौर, , बेंगलुरू, देहरादून अशा विविध ठिकाणच्या विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट चित्रांची निवड दिनदर्शिकेसाठी करण्यात आली.”
दिनदर्शिकेत मुलांनी अत्यंत विचारपूर्वक आणि सुंदर पद्धतीने तयार केलेल्या चित्रांमधून रस्ते सुरक्षेची भावना किती खोलवर रुजलेली आहे, हे स्पष्ट दिसून येते. तसेच या चित्रांसोबत वाहतूक नियमांची चिन्हे व त्यांची माहितीही या दिनदर्शिकेत देण्यात आलेली आहे.
वैशिष्ट्यपूर्ण ‘नो हॉर्न डे’-
जनआक्रोशच्या दिनदर्शिकेतील एक वेगळेपण म्हणजे दर महिन्याच्या ३ तारखेला ‘नो हॉर्न डे’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या दिवशी वाहनांचे हॉर्न वाजवू नये आणि किमान एक दिवस तरी ध्वनी प्रदूषण टाळावे, असा संदेश या उपक्रमातून दिला जातो, असे कासखेडीकरांनी सांगितले.
रस्ते सुरक्षेच्या जनजागृतीत बालकांचा सहभाग वाढवून भविष्यासाठी सुरक्षित मार्ग तयार करण्याचा हा उपक्रम महत्त्वाचा ठरतो आहे.








