
चंद्रपूर : येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक जाहीर होताच सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, उमेदवार निवडीच्या प्रक्रियेला वेग आला आहे.
याच अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या ६०० पेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज चंद्रपूरमध्ये घेण्यात आल्या. या मुलाखतींसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते चेनसुख संचेती, माजी मंत्री हंसराज अहिर तसेच आमदार किशोर जोरगेवार उपस्थित होते.
दरम्यान, या प्रक्रियेदरम्यान भाजपमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उघड झाली. आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या गटांकडून उमेदवारांच्या नावांबाबत स्वतंत्र दावे केले जात असल्याने पक्षातील राजकीय हालचालींना आणखी वेग आला आहे.
मनपा निवडणूक जवळ येत असताना उमेदवार निवड, समन्वय आणि गटबाजी यावरून भाजपसह इतर पक्षांतही हालचाल वाढल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आगामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक अत्यंत चुरशीची आणि रंगतदार ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.








