Published On : Tue, Jun 29th, 2021

शासनाच्या योजनांची काटेकोर अंमलबजावणी करा -खासदार सुनील मेंढे

Advertisement

दिशा आढावा बैठक

भंडारा:- सर्व सामान्य नागरिकांच्या हिताच्या व लाभाच्या केंद्र तसेच राज्य शासनाच्या योजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश खासदार सुनील मेंढे यांनी दिले. विकास कामाचे नियोजन करतांना सामूहिक तसेच वैयक्तिक लाभाच्या योजनांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात यावा असेही त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद सभागृहात आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या (दिशा) आढावा बैठकीत ते बोलत होते.

आमदार डॉ. परिणय फुके, जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझाडे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा संघमित्रा कोल्हे, समिती सदस्य व विविध विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्ह्यातील 1 लाख 85 हजार 351 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. यापैकी 40 हजार 707 शेतकऱ्यांना 4 कोटी 31 लाख रुपयांचा विमा मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी दिली. त्याचप्रमाणे महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील 31 हजार 149 सभासदांना 153 कोटी 52 लाख रुपयांची कर्जमुक्ती देण्यात आली. पीक विमा योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्याच्या सूचना खासदारांनी दिल्या. मुद्रा लोन योजनेत 10 हजार 505 सभासदांना 132 कोटी 79 लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. गरजू व्यक्तींना प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ देण्यात यावा.

वाळू घाटाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. रेती चोरीबाबत अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. घाटाचा ड्रोन सर्व्हे करण्यात यावा असे निर्देश त्यांनी दिले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत 37 लाख 63 हजार मनुष्य दिवस मजुरीची निर्मिती झाली आहे. याची टक्केवारी 87.47 आहे. 8 दिवसात मजुरांच्या मजुरीच्या प्रदानाची टक्केवारी शंभर टक्के असून भंडारा जिल्हा राज्यात प्रथम आहे. याबद्दल यंत्रणेचे अभिनंदन करण्यात आले आहे. मनरेगा मध्ये नाविन्यपूर्ण कामे घेण्यात यावी. मागेल त्याला गोठा हे धोरण अवलंबावे अशा सूचना खासदारांनी दिल्या.

सर्वांना घरे योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, आवासप्लस, राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात यावेत. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत आतापर्यंत 33 हजार 795 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. जननी सुरक्षा योजनेत सन 2020- 21 मध्ये 6 हजार 238 प्रसूती करण्यात आल्या. कुटुंब नियोजनात 56 टक्के काम झाले आहे. आरोग्याच्या अन्य योजनेचाही लाभ गरजूंना देण्यात यावा. जिल्ह्यातील प्रत्येक गावात फळझाड लागवड योजनेत फळझाड लावण्यात यावेत असे ते म्हणाले. उमेद अंतर्गत जिल्ह्यात 13 हजार 217 स्वयं सहायता समूह असून याद्वारे बचत गटांचे सक्षमीकरण व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात सर्वात कमी एनपीए हा भंडारा जिल्ह्यातील बचत गटांचा आहे.

प्रधानमंत्री सहज बिजली हर घर सौभाग्य योजनेत 4 हजार 621 लाभार्थ्यांना वीज जोडण्या देण्यात आल्या. दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेअंतर्गत एकूण 3 हजार 765 लाभार्थ्यांना वीज पुरवठा करण्यात आला आहे. यासह अनेक योजनेत चांगले काम झाले आहे. सभेचे कार्यवृत सदस्यांना सभेच्या किमान एक आठवडा आधी देण्याच्या सूचना यावेळी अध्यक्षांनी दिल्या.

मागील सभेच्या इतिवृत्तावर कार्यवाही, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, दीनदयाल अंत्योदय योजना, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री ग्राम आवास योजना, स्वच्छ भारत मिशन शहरी व ग्रामीण, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, राष्ट्रीय भूमी अभिलेख व्यवस्थापन कार्यक्रम, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय स्वास्थ अभियान, एकात्मिक बाल विकास योजना, मध्यान्ह भोजन योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, मुद्रा योजना व डिजिटल इंडिया आदी योजनांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. बैठकीचे संचालन संघमित्रा कोल्हे यांनी केले.