Published On : Fri, May 1st, 2020

खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा – अजित पवार

Advertisement

पुणे जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक…

पुणे : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खते, बियाणे, किटकनाशके उपलब्ध करुन देण्याबाबतचे आवश्यक ते नियोजन कृषि विभागाने करावे. कृषि निवीष्ठाबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यासाठी भरारी पथके नेमून जादा दराने विक्री होणार नाही याबाबत दक्ष राहून खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विभागीय आयुक्त कार्यालयात खरीप हंगाम आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पडघलमल, महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.शितलकुमार मुकणे, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आनंद बेडेकर आदींसह लोकप्रतिनिधी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पुणे जिल्हयात २ लाख ३० हजार ९३७ हेक्टर क्षेत्राचे खरीप हंगामासाठी नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये भात, बाजरी, मका, नाचणी, सोयाबीन क्षेत्राचा समावेश आहे. यासाठी २६ हजार क्विंटल बियाणांची गरज आहे. शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे थेट बांधावर खते कृषि निवीष्ठा उपलब्ध करुन देण्यासोबतच यामध्ये कोणत्याही परिस्थितीत हयगय करु नका. कृषि निवीष्ठाबाबत भरारी पथकाच्या माध्यमातून लक्ष ठेवणे आवश्यक असून यामध्ये जादा दराने विक्री होणार नाही तसेच याबाबत शेतकऱ्याची अडवणूक होणार नाही यादृष्टीने सतर्क राहण्याच्या सूचनाही अजित पवार यांनी दिल्या.

शेतकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या बियाणांची उगवणक्षमता दर्जेदार असावी असे सांगून अजित पवार यांनी कृषि विभागाने बियाणे उपलब्धतेबाबत व त्याच्या गुणवत्तेबाबत अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावे. उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना स्वत:कडील दर्जेदार बियाणेही वापरणे शक्य होईल. शेतकऱ्यांना खते व पिक नियोजन सुलभ होण्याच्यादृष्टीने माती परिक्षण महत्वाचे असल्याचे सांगून शेतकरी ते ग्राहक थेट बाजारव्यवस्था उभारणीबाबतचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात येणार असल्याचेही सांगितले.

जिल्हयातील दुरुस्तीअभावी बंद असलेल्या ट्रान्सफार्मरबाबतची अडचण तसेच शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे सांगून खत मागणी व पुरवठा, कृषि निविष्ठा विक्रेत्यांची संख्या, गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांसाठी नमुन्याचे नियोजन, संनियत्रणासाठी स्थापन केलेली भरारी पथके, संनियंत्रण कक्ष, राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान, उन्नत शेती, समृध्द शेती, मागेल त्याला शेततळे, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, खरीप, रब्बी पीक कर्जवाटप, विंधन विहीर दुरुस्ती, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आदी विषयांचा सविस्तर आढावा अजित पवार यांनी घेतला.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्हा खरीप हंगाम २०२० च्या नियोजनाबाबत सादरीकरणाव्दारे सविस्तर माहिती दिली. यावेळी विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement