मुंबई : सण-उत्सव साजरे करताना ध्वनी आणि वायुप्रदूषण होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश देत मुंबई उच्च न्यायालयाने सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. धार्मिक मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजातील लाऊडस्पीकर, डीजे आणि लेझर बीमचा वापरही अनावश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने ध्वनी व वायुप्रदूषणाच्या मुद्द्यावर स्वतःहून दखल घेत ही भूमिका मांडली. सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडल्याने अपघाताचा धोका वाढण्यासोबतच विषारी प्रदूषण होते, असे न्यायालयाने नमूद केले.
मिरवणुकांमध्ये होणाऱ्या मोठ्या आवाजावरही न्यायालयाने चिंता व्यक्त केली. उत्सव साजरा करण्यास न्यायालयाचा विरोध नसून, नागरिकांच्या आरोग्याला आणि सुरक्षिततेला बाधा न आणता उत्सव साजरे झाले पाहिजेत, असे खंडपीठाने स्पष्ट केले.
मिरवणुकीसाठी पोलिसांची परवानगी घेतलेल्या आयोजकांनी ती परवानगी ठळकपणे प्रदर्शित करावी, तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास सुरक्षा अनामत रक्कम जप्त करण्याचा विचार सरकारने करावा, अशी सूचनाही न्यायालयाने केली.
कायदे आणि नियम अस्तित्वात असूनही त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यास त्याचा नागरिकांवर परिणाम होतो. त्यामुळे नियमांचे काटेकोर पालन आणि उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई आवश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटले.





