बेला : उमरेड तालुक्यातील बेला हे संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. गावात अनेक संतांची मंदिरे असून, त्यापैकी काही मंदिरे पुरातन काळापासून अस्तित्वात आहेत. याच पुरातन मंदिरांपैकी एक असलेले बालाजी मंदिर आजही आपले ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व जपत उभे आहे. मात्र, सध्या या मंदिराची झालेली दुरवस्था पाहता भक्तांनी मंदिराकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे.
बालाजी मंदिराच्या भिंतींना ठिकठिकाणी तडे गेले असून, मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वनस्पती वाढलेल्या आहेत. पुरातन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या मंदिराच्या देखभालीकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
नवरात्र उत्सवादरम्यान या मंदिराची विशेष सजावट केली जाते आणि येथे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या पुरातन मंदिराचा योग्य पद्धतीने जीर्णोद्धार करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
मंदिराचा जीर्णोद्धार करून त्याचे जुने वैभव पुन्हा प्राप्त करून द्यावे आणि भक्तांसाठी मंदिर परिसर अधिक सुस्थितीत करावा, अशी अपेक्षा बेला येथील नागरिक व्यक्त करीत आहेत.
विशेष म्हणजे, या पुरातन बालाजी मंदिराकडे दानस्वरूपात शेतीसह स्थावर मालमत्ताही असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर करून मंदिराच्या देखभालीसह जीर्णोद्धाराकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.





