Published On : Sat, Oct 3rd, 2020

मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करा -नाना पटोले

नागपूर : कोरोनामुळे बाधित रुग्णांची संख्या व मृत्यूदर वाढत आहे. शासकीय व खासगी रुग्णालयात रुग्णांवर तात्काळ उपचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी केंद्र शासनाकडे निधीचा प्रस्ताव सादर करा, यासाठी स्वतःही पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज येथे केले.

सप्टेंबरच्या मध्यात मृत्यू दर वाढला होता. आता तो कमी होत आहे. मात्र तरीही ही चिंतेची बाब आहे. मृत्यू दर का वाढला याचा आढावा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतला.

हैद्राबाद हाऊस येथे झालेल्या बैठकीत त्यांनी विदर्भाच्या आरोग्य यंत्रणेची जबाबदारी असणाऱ्या मेयो, मेडिकल व एम्स यंत्रणेला बळकट करण्यासाठी केंद्र शासनाकडे एक हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. सोबतच सर्व धर्मदाय इस्पितळाना कोविड उपचार यंत्रणेमध्ये सक्रिय करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. या काळात चॅरिटी हॉस्पिटलनी नागरिकांसाठी कोरोना उपचारा करिता स्वतःहून पुढे येण्याची अपेक्षा आहे. यात मागे राहिलेल्या हॉस्पिटलला गतिशील करण्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आजच्या बैठकीला आमदार विकास ठाकरे, आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, आरोग्य उपसंचालक डॉ. संजीव जयस्वाल, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, मनपा अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा,अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सजल मित्रा, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलिया, जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डि.एस.सेलोकर,अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त गडेकर, अतुल लोंढे व आरोग्य यंत्रणेतील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी त्यांनी नागपूरमधील मृत्युदर का वाढला याची कारणे जाणून घेतली.अशावेळी धर्मदाय हॉस्पिटल काय करतायेत? असा प्रश्न उपस्थित करीत, गेल्या सहा महिन्यात कोरोना संदर्भात या रुग्णालयांनी गरीबांच्या सेवेसाठी काय केले या बद्दलचा अहवाल सादर करण्याचे निर्देशित केले. तसेच यापूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या निर्देशांची कुठपर्यंत पूर्तता झाली. त्याबाबतचा आढावा घेतला.

नागपूरमध्ये सर्वसामान्य माणसाला आरोग्य यंत्रणेने बाबतची अद्ययावत माहिती नाही, असे होता कामा नये. सामान्यातल्या सामान्य माणसाला शासकीय व खाजगी हॉस्पिटलमधील बेडची उपलब्धता सहज माहिती पडेल, अशी यंत्रणा लोकाभिमुख करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत सामान्यातील सामान्य नागरिकाला लाभ झाला पाहिजे. काही खाजगी हॉस्पिटलकडून मोठ्या प्रमाणात ॲडव्हान्स घेतली जाते. यासंदर्भात त्यांनी पोलीस यंत्रणेकडे यावेळी विचारपूस केली. पोलिसांनी खाजगी डॉक्टरांच्या अडचणी व शहरात या काळामध्ये पोलिसांना द्यावी लागत असलेली सुरक्षा व्यवस्था या बाबतची माहिती दिली. विधानसभा अध्यक्षांनी सर्व खाजगी हॉस्पिटलनी दर्शनी भागामध्ये कोरोना संदर्भातली तपासणी बाबतची दरपत्रके लावण्याचे निर्देशीत केले. या संदर्भात महानगरपालिकेने घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करताना ही दरपत्रके दर्शनी भागात लावली जातात अथवा नाही याकडे लक्ष वेधण्याचे सांगितले. शासकीय असो वा खासगी प्रत्येक रुग्णाला दाखल करून घेण्याकडे वैद्यकीय यंत्रणेचा कल असावा. गरीब, गंभीर रुग्ण काही खाजगी हॉस्पिटलमधून ऐनवेळी परत पाठविले जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. दवाखान्याच्या दारावर खासगी सुरक्षारक्षकांनी डॉक्टरांच्या आधी रुग्णांना हाकलून लावल्याच्या तक्रारी आल्या आहेत. याबाबत पोलिसांनी लक्ष वेधण्याचे त्यांनी निर्देश दिले, अशा पद्धतीची बाउंसर संस्कृती नागपूर मध्ये रुजू होता कामा नये, असेही त्यांनी पोलिसांना सांगितले.

नागपूरमध्ये सध्या बेडची उपलब्धता आहे. ऑक्सिजन व औषधी देखील कमी नाही. त्यामुळे नागपूर महानगरातील प्रत्येक नागरिकांची तपासणी व्हावी. तसेच अन्य जिल्ह्यांच्या ठिकाणांहून येणाऱ्या अहवालाची तातडीने तपासणी करून अहवाल परत जावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नागरिकांनी या काळात महानगरपालिकेकडून जारी करण्यात आलेल्या संपर्क व्यवस्थेचा लाभ घ्यावा. खाजगी हॉस्पिटल कडून अधिक आलेल्या बिलाबाबत लेखापरीक्षण केले जात आहे. बीलांच्या तक्रारी व खाटांच्या उपलब्धतेबाबत 0712- 2567021या क्रमांकावर माहिती घ्यावी. या क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले. कोणत्याही नागरिकाने पैशाअभावी, व्यवस्थेअभावी अंगावर आजार काढण्याचे करू नये. आरोग्य व्यवस्था आणखी बळकट केली जाईल. तिचा लाभ घ्यावा. सरकारी आरोग्य यंत्रणा अतिशय उत्तम पद्धतीने काम करत असून नागरिकांनी या यंत्रणेवर विश्वास ठेवून आरोग्याची तपासणी करावी, असे आवाहन केले.

यावेळी त्यांनी उपस्थित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना नागपुर मधील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी 500 कोटी रुपये देण्याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्याकडे आपण स्वतः मागणी केली आहे. त्यामध्ये आणखी काही भर टाकून एक हजार कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार करावा. या माध्यमातून उपलब्ध आरोग्य यंत्रणेला अधिक बळकट करावे तसा प्रस्ताव सादर करावा. आपण स्वतः या संदर्भात पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.

विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी विभागासह शहरात उपलब्ध आरोग्य सुविधांची माहिती दिली.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अतिरिक्त 400 काटा उपलब्ध होणार असून यासाठी आवश्यक सुविधा पूर्ण होत आहे. कोरोना चाचणी वाढविण्यास सोबत सामान्य जनतेला आवश्यक सुविधा देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

खाजगी रुग्णालयांतील देयकांची तपासणी
कोरोना बाधित रुग्णांवर खाजगी रुग्णालयात केलेल्या अपचारासंदर्भात जादा देयक आकारत असल्याच्या तक्रारीची दखल घेवून रुग्णांवर केलेल्या उपचारासाठी राज्य शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त आकारणी केलेल्या 88 हॉस्पिटलची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्त राधाकृष्ण बी. यांनी दिली.

रुग्णालयांनरी जादा शुल्क आरारल्याबद्दल जनतेकडून दाखल झालेल्या तक्रारीची दखल घेवून संबंधित रुग्णालयांना 36 लाख रुपये परत करण्याचे आदेश देण्यात आले आहे. ज्या रुग्णांना जादा देयक देण्यात आले आहे. त्यांनी देयकाच्या प्रतिसोबत तक्रार अर्ज महापालिकडे सादर करावे. प्रत्येक तक्रारीची दखल घेण्यात येईल असे आवाहन जनतेला यावेळी आयुक्तांनी केले.

बेडसाठी नियंत्रणकक्षात फोन करा
कोरोना रुग्णांसाठी शासकीय व खाजगी रुग्णालयात उपलब्ध बेड व रिकामे असलेल्या बेड संदर्भात संपूर्ण माहिती महानगरपालिकेव्दारे गोळा करण्यात येत आहे. कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध करुन देण्यासाठी महानगर पालिकेच्या कोविड नियंत्रण कक्षाला दूरध्वनी केल्यास बेड उपलब्ध करुन देण्यात येईल. अशी माहिती महानगर पालिकाआयुक्त राधाकृष्ण बी. यांनी यावेळी दिली.