नागपूर : शहरातील लकडगंज झोन अंतर्गत प्रभाग २४ मधील नेताजी नगर, अटल बिहारी वाजपेयी मनपा उद्यानात बुधवारी महापौर महापौर दयाशंकर तिवारी व पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे (एस.टी.पी.) भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी माजी स्थायी समिती सभापती व ज्येष्ठ नगरसेवक प्रदीप पोहाणे, ईश्वर कावरे, लकडगंज झोन सभापती मनीषा अतकरे, नगरसेवक राजकुमार शाहू, माजी नगरसेवक प्रमोद पेंडके, बाळा वानखेडे, रामावतार अग्रवाल, अजय तारोडकर, संदीप दखनकर, भारत सारवा, राकेश पाटील, शैलेश नैताम, उर्मिला भोंडे, शंकर गौर, गुलाब माथूरकर, नंदा पालांदुरकर, आशिष मेहर, भूषण इंगळे, प्रमोद शाहू, मनोज शेंदरे, रवी गजधाने आदी उपस्थित होते.
नागपूर शहरातील नाग आणि पिवळी नदीलगत असलेल्या सुमारे १२ बगिच्यांमध्ये छोटा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एस.टी.पी.) उभारून त्यातून शुद्ध होणाऱ्या पाण्याच्या वापर बगिच्यांमध्ये करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत नाग नदी जवळील प्रभाग २४ मधील नेताजी नगर येथील अटल बिहारी वाजपेयी मनपा उद्यानात उद्यानात हे प्लांट सुरू करण्यात येईल. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने हे १२ प्रकल्प उभारण्यात येणार असून १५ ऑगस्टपर्यंत तीन ते चार प्रकल्पांच्या कामाचे भूमिपूजन अपेक्षित असल्याचे आशावाद महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर लकडगंज झोन अंतर्गत प्रभाग २४ मधील नेताजी नगर येथील अटल बिहारी वाजपेयी मनपा उद्यानात प्लांट बसविण्याबाबत स्थानिक नगरसेवक प्रदीप पोहाणे यांनी पुढाकार घेतला. या प्लांटमध्ये नाग नदीच्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी अटल बिहारी वाजपेयी उद्यानातील झाडांसाठी वापरण्यात येणार आहे. त्यांच्या या पुढाकाराबद्दल महापौरांनी त्यांचे अभिनंदन केले.
एस.टी.पी. उभारण्यासाठी केंद्र सरकारने जापानच्या एका कंपनीला प्रमाणित केले असून त्याच कंपनीच्या माध्यमातून नागपुरात सदर प्रकल्प उभारण्यात येत आहे. यामुळे बगिच्यांना यथायोग्य पाणी मिळेल आणि पिण्याकरिता असणाऱ्या शुद्ध पाण्याची बचत होणार आहे.
पाच हजार लिटर प्रतिदिन एवढी प्रकल्पाची क्षमता आहे. या प्रकल्पामुळे उपयोगात न येणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार असल्याने आणि त्याचा उपयोग बगिच्यांच्या देखभालीसाठी करण्यात येणार असल्याने नागपूर शहर इतर शहरांसाठी आदर्श ठरणार आहे, असे महापौर यावेळी म्हणाले.

