Published On : Thu, Jun 4th, 2020

धोकादायक इमारतींचा वापर तात्काळ थांबवा

Advertisement

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन : शहरात १७३ इमारती जीर्ण व धोकादायक अवस्थेत


नागपूर : पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारती किंवा घरांचा वापर करणे जिकरीचे आहे. अशा इमारती किंवा घरांचा वापर केल्यास जीवित व वित्त हानी होण्याचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांनी धोकादायक इमारती किंवा घरांमध्ये रहिवास किंवा वापर करणे तात्काळ थांबवावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. धोकादायक इमारतीचा वापर न थांबविल्यास दुर्दैवीरित्या अपघात घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित इमारत किंवा घर मालकाची राहिल, असा इशारा ही त्यांनी दिला आहे.

राज्य शासनाच्या नगर विकास विभागाच्या परिपत्रकानुसार जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींबाबत पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील विविध प्रवर्गाच्या इमारतींचे झोन निहाय सर्वेक्षण करण्यात आले असून यामध्ये एकूण १७३ इमारती जीर्ण व धोकादायक अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे अतिधोकादायक राहण्यास अयोग्य व तात्काळ निष्कासित करावयाच्या ९७ इमारती आढळल्या आहेत. याशिवाय इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरूस्ती करावयाच्या २५ इमारती, इमारत रिकामी न करता संरचनात्मक दुरूस्ती करावयाच्या ३५ इमारती आणि किरकोळ दुरूस्ती करावयाच्या १६ इमारतींचा समावेश आहे. या सर्व इमारतींची यादी मनपाच्या nmcnagpur.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Gold Rate
09 july 2025
Gold 24 KT 96,700 /-
Gold 22 KT 89,900 /-
Silver/Kg 1,08,200/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर महानगरपालिका अधिनियम कलम २६५(अ) नूसार वापर सुरू होउन ३० वर्षापेक्षा अधिक काळ झालेल्या इमारतींचे संरचना परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) मनपाकडे नोंदणी केलेल्या बांधकाम अभियंता किंवा संरचना परीक्षक अभियंत्याकडून करणे अनिवार्य आहे. इमारतीचा वापर किंवा इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र (पूर्ण अथवा अंशत:) क्षेत्रफळ वापराखाली आणले गेले अशा दिवसापासून ३० वर्षापेक्षा जास्त काळ मोजावयाचा आहे. मनपाद्वारे नोंदणी केलेल्या संरचनात्मक परीक्षक अभियंत्यांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. मनपाद्वारे नेमलेल्या संरचनात्मक परीक्षक अभियंत्याकडून शिफारशी केलेली दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मनपाच्या संबंधित झोन कार्यालयात सादर करणे अनिवार्य आहे.

शहरातील एखाद्या इमारतीचा काही भाग, छप्परकाम, जिना, विटकाम आदी भाग धोक्याचे, जीर्ण किंवा मोडकळीस आल्याचे निदर्शनास आल्यास त्याची सूचना झोन कार्यालयाला देण्यात यावी. यासंदर्भात सदर इमारतीपासून होणारा धोका नाहिसा करण्याच्या दृष्टीने मनपाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येईल, असेही मनपा आयुक्तांनी सांगितले.

सर्वेक्षणात जी घरे किंवा इमारती अतिधोकादायक व राहण्यास अयोग्य असल्याचे निदर्शनास आले त्या इमारतींना तात्काळ निष्कासित करण्याबाबत घर किंवा इमारतींना नोटीस बजावून तेथील नागरिकांनी १५ दिवसाच्या आत घर त्वरीत खाली करावे. नोटीस नंतरही घर खाली न केल्यास सदर व्यक्तींना घर, इमारत किंवा त्या भागातून पोलिसांकडून काढून टाकण्याची कारवाई केली जाईल. याशिवाय संरचना परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्यास एखादी संस्था किंवा मालक टाळाटाळ करीत असल्यास त्यांच्यावर २५ हजार रुपये किंवा संबंधित इमारत किंवा घराचे वार्षिक मालमत्ता कराची रक्कम यापैकी जी जास्त असेल तेवढ्या रक्कमेचा दंड ठोठावण्यात येईल, असेही आयुक्तांनी सांगितले.

मदतीसाठी संपर्क साधा
शहरातील एखादी इमारत अथवा तिचा काही भाग आकस्मिकरित्या कोसळल्यास आवश्यक मदतीकरीता नागपूर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षामधील ०७१२-२५६७०२९, २५६७७७७, ७०३०९७२२०० किंवा १०१ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement