Published On : Thu, Jun 4th, 2020

मास्क न वापरल्यास २०० रुपये दंड

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश : तिनदा दंडात्मक कारवाई झाल्यानंतर होणार गुन्हा नोंद

नागपूर: कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी वावरताना प्रत्येकाने त्रिस्तरिय फेस मास्क चा वापर करणे बंधनकारक आहे. घराबाहेर सार्वजनिक वा इतर कोणत्याही ठिकाणी वावरताना मास्क न लावल्यास २०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे एकाच व्यक्तीकडून तिनदा दंड वसूल करण्यात आल्यास त्या व्यक्तीवर फौजदारी कारवाई करण्यात येईल. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या संदर्भात आदेश निर्गमित केले असून शुक्रवार ५ जून पासून हे आदेश अंमलात येतील.

Gold Rate
13 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,800 /-
Gold 22 KT ₹ 1,02,100 /-
Silver/Kg ₹ 1,29,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आपण सर्व कोव्हिडशी लढा देत आहोत. कोव्हिडचा संसर्ग तोंड, नाक आणि डोळ्यांतून जास्त होतो. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने मास्क लावणे बंधनकारक आहे. साथरोग अधिनियम १९८७ आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतूदी अनुसार नागपूर शहर सीमेत सार्वजनिक ठिकाणी, कार्यालयाच्या ठिकाणी, वाहतूक करताना व इतर ठिकाणी मास्क लावणे अनिवार्य आहे. मास्क न लावल्यास संबंधित व्यक्तीकडून २०० रूपये दंड आकारण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहे.

नागपूर महानगरपालिकेचे उपद्रव शोध व निर्मूलन पथकातील कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता अधिकारी, सर्व झोनचे सहायक आयुक्त व त्यापेक्षा वरीष्ठ दर्जाचे मनपाचे सर्व संबंधित अधिकारी, सर्व संबंधित पोलिस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरीष्ठ अधिकारी तसेच सर्व कार्यालयांमध्ये संबंधित आस्थापना कार्यालय प्रमुखांनी प्राधिकृत केलेले अधिकारी व कर्मचारी यांना या आदेशाची अंमलबजावणी व दंडात्मक कारवाई करिता प्राधिकृत करण्यात आले आहे.

सदर आदेश नागपूर महानगरपालिका हद्दीतील शासकीय, निमशासकीय, खाजगी, विविध मंडळे, परिमंडळे, महामंडळे, औद्योगिक, व्यावसायिक, वाणिज्य, शैक्षणिक, वैद्यकीय, रहिवासी क्षेत्र व संकुले, रेल्वे स्थानके, बस स्थानके, न्यायालयीन संस्था, देवस्थान, बगीचे, पर्यटनस्थळे, शॉपिंग मॉल, तरणतलाव, सिनेमागृह, व्यायामशाळा, रस्ते, बाजारपेठा, हॉटेल्स आदी संस्था, आस्थापना व सार्वजनिक ठिकाणी अथवा आवारात लागू राहतील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे. आपल्यामुळे कुणाला किंवा दुस-यामुळे आपल्याला संसर्ग होउ नये यासाठी प्रत्येकानेच मास्क वापरणे आवश्यक आहे. कुठल्याही कामासाठी घराबाहेर निघताना मास्क लावूनच निघावे, असे आवाहनही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement