Published On : Wed, Oct 10th, 2018

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादीचा काटोलमध्ये रास्ता रोको

काटोल: नुकसान होऊन सुद्धा शेतकऱ्यांना एका पैशाची भाजपा सरकार करून अद्यापही मदत करण्यात आली नाही. मदत तर सोडा सरकारकडून खरेदी केलेल्या तुरी व चण्याची अद्याप चुकारे देण्यात आले नाही. शिवाय ज्या तुर व चण्याची नोंदणी करण्यात आली परंतु त्याची खरेदी झाली नाही त्या शेतकऱ्यांना १ हजार रुपये प्रतिक्विंटल बोनस देण्याचे राज्य सरकारने आदेश दिले होते. परंतु त्यावर सुद्धा कारवाई करण्यात आली नाही या व इतर मागण्या साठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात काटोल येथे रास्ता रोको करून भाजपसरकार चा अंत्यविधी करण्यात आला.

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी काटोल येथे माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात सुरुवातीला धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना अनिल देशमुख यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सुद्धा चार वर्षात एक रुपयाही त्यांच्या खात्यात जमा करण्यात आला नाही. मदत तर सोडा जाहीर केलेली कर्जमाफी अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज सुद्धा देण्यात आले नाही. सोयाबीन वर येलोमोझेक व खोड किडींचा प्रादुर्भावाने संपूर्ण पीक वाया गेले आहे. शेतकऱ्यांनी त्यावर रोटावेटर चालविले. उत्पादन खर्च तर सोडा शेतकऱ्यांच्या घरात एक दाणा सुद्धा येणार नाही अशी परिस्थिती असताना भाजपा सरकारने अद्यापही साधा सर्वे करण्याचा आदेश सुद्धा दिला नाही. भाजपा सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप सुद्धा यावेळी अनिल देशमुख यांनी केला.

कपाशीच्या पिकावर संदर्भात सुद्धा हीच परिस्थिती आहे. खरेदी केलेल्या तुरी व चनाचे तब्बल 148 कोटी रुपये अद्यापही देणे बाकी आहे. 19 जून 2018 ला आदेश काढून ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली परंतु तूर व चण्याचे खरेदी झाली नाही अशा शेतकऱ्यांना एक हजार रुपये बोनस देण्याचे सांगितले होते. परंतु अद्यापही एकाही शेतकऱ्यांना हा बोनस देण्यात आलेला नाही. एकीकडे निसर्ग शेतकऱ्यावर कोपला असताना भाजपा सरकार सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्याला मदत देण्याचे सोडून वेगवेगळे आश्वासन देऊन त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सुद्धा भाजपा सरकार करीत असल्याचा आरोप यावेळी अनिल देशमुख यांनी केला.

धरणे आंदोलन नंतर अचानक कार्यकर्त्यांनी आंबेडकर चौक येथे येऊन रास्ता रोको केले. तसेच सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून अंत्यविधी केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात शेतकरी शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.