नागपूर: एकीकडे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. देशमुख यांच्यावर काटोल-जालालखेडा रस्त्यावर बेलफाट्याजवळ काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. नरखेड येथे सभा आटोपून देशमुख तिनखेडा-भिष्णूर मार्गाने काटोलला परतत असताना हा प्रकार घडला.
या हल्ल्यात अनिल देशमुख गंभीर जखमी झाले असून, त्यांना तत्काळ काटोल येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यात देशमुख यांच्या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली असून, त्यांनी तपास सुरू केला आहे. हल्लेखोरांचे उद्दिष्ट आणि ओळख अद्याप अस्पष्ट असून, पुढील तपशील येणे बाकी आहे.
या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, समर्थक आणि नेत्यांनी या घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.