Published On : Fri, Jul 9th, 2021

आरोग्यदायी, निरोगी महाराष्ट्राच्या ध्येय्यासाठीचे पाऊल – मुख्यमंत्री

Advertisement

– मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाचे उद्घाटन, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचा स्तुत्य उपक्रम

भंडारा:- कोरोना परिस्थितीत आवश्यक असलेल्या हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल यांसारख्या क्षेत्रामध्ये विविध 36 अभ्यासक्रमांमधून येत्या तीन महिन्यात 20 हजार इतके प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Gold Rate
24 April 2025
Gold 24 KT 96,500 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver / Kg 98,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाचा 8 जुलै 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक, उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. भंडारा जिल्ह्याला 300 उमेदवार प्रशिक्षित करण्याचे लक्ष प्राप्त झाले असून जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे 40 विद्यार्थ्यांच्या तुकडीचे ऑन जॉब ट्रेनिंग पध्दतीने प्रशिक्षण मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करुन सुरू झाले आहे.

उपजिल्हा रुग्णालय तुमसर, भंडारा पॅरामेडीकल येथे सुध्दा याच दिवशी 30 विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण सुरू झालेले आहे. सदर उद्घाटन कार्यक्रमास भंडारा येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी जी. एच. भूगावकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. एस. फारुकी, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, नोडल अधिकारी डॉ. पियुष जक्कल, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. माधूरी माथूरकर, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक सोनु उके व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्राचे महत्व अधोरेखीत झाले आहे. या क्षेत्राला भरीव मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. 8 जुलै रोजी सुरु करण्यात आलेल्या योजनेतून आरोग्य क्षेत्राला कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल. हे आरोग्यदायी, निरोगी महाराष्ट्राच्या ध्येय्याकडे वाटचाल करतानाचे महत्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, काळाची गरज ओळखून आपण हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करत आहोत. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात पुरवणी मागण्याद्वारे आरोग्य विभागाला सर्वाधिक निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. कोरोना संकटकाळात आपण आरोग्य क्षेत्रासाठी सोयी-सुविधांची मोठ्या प्रमाणात उभारणी केली आहे. पण या सोयी-सुविधा चालवणारे प्रशिक्षीत मनुष्यबळ उपलब्ध नसेल तर त्याचा उपयोग होत नाही. आता कौशल्य विकास विभागाने सुरु केलेल्या उपक्रमातून हे मनुष्यबळ तयार होण्याबरोबरच राज्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. राज्यात ही योजना प्रभावीपणे राबविली जाईल, असे श्री. ठाकरे म्हणाले.

“सर्वांसाठी आरोग्य” धोरणाला चालना देण्यासाठी आरोग्य क्षेत्रात कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीतर्फे हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात येणार आहे. आरोग्य क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळ अधिक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्य विकास प्रदान करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. राज्यातील 348 इतकी वैद्यकीय महाविद्यालये, शासकीय रुग्णालये तसेच उत्कृष्ट खाजगी रुग्णालये यांना प्रशिक्षण केंद्र म्हणून नोंदीत करण्यात आले असून यामाध्यमातून प्रशिक्षणासह ऑन जॉब ट्रेनिंग पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याकरीता सर्व जिल्ह्यांमध्ये एकूण 500 प्रशिक्षण केंद्रे कार्यन्वित करण्यात येणार आहेत. या केंद्रांमधून 20 हजार उमेदवारांना प्रशिक्षण देण्याचे उद्धिष्ट आहे. यातील 5 हजार उमेदवारांना पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येईल. दर्जेदार पायाभूत सुविधा असलेल्या रुग्णालयांमध्ये उमेदवारांना हे प्रशिक्षण स्थानिक पातळीवरच उपलब्ध होईल. प्रशिक्षणाचा लाभ घेण्याकरिता राज्यातील युवक, युवतींनी कौशल्य विकास विभागाच्या https://www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र.ग. हरडे यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी बी. के. निबांर्ते, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक सोनु उके, प्रशांत कोसरकर, श्रीमती आशालता वालदे, आय. जी. माटुकर तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी- कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Advertisement
Advertisement