Published On : Fri, Jul 9th, 2021

एजी आणि बीव्हीजीच्या कार्यप्रणालीबाबत नगरसेवकांचे अभिप्राय घ्या

– उपायुक्तांच्या उपस्थितीत होणार प्रत्येक झोनमध्ये बैठक : महापौरांद्वारे गठीत समितीचा निर्णय


नागपूर : शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या एजी एन्व्हायरो आणि बीव्‍हीजी या कंपन्यांच्या कार्यप्रणालीबाबत झोनल अधिका-यांपाठोपाठ झोन सभापती व सहायक आयुक्तांचे मत मागण्यात आले. झोनल अधिकारी आणि सहायक आयुक्त यांच्या मतांमध्ये विसंगती असल्यामुळे दोन्ही कंपन्यांच्या संपूर्ण कार्यप्रणालीची आणखी सखोल चौकशी आवश्यक असून यामध्ये आता सर्व नगरसेवकांचे अभिप्राय घेण्यात यावे, असे निर्देश सत्तापक्ष नेते तथा समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी दिले.

एजी एन्व्हायरो आणि बीव्हीजी कंपनीच्या कामामध्ये त्रुटी आढळल्यास त्यावर होणारी कारवाई तसेच कंपनीद्वारे बेकायदेशीर काम होण असल्यास नियमाप्रमाणे कारवाई करणे याकरिता महापौर दयाशंकर तिवारी यांच्याद्वारे सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे यांच्या अध्यक्षतेत पाच सदस्यीय समिती गठीत करण्यात आली. या समितीद्वारे शुक्रवारी (ता.९) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये बैठक घेण्यात आली. बैठकीत समिती अध्यक्ष सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, सदस्य वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती महेश महाजन, सदस्य अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, सदस्य उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन राजेश भगत, लक्ष्मीनगर झोन सभापती पल्लवी श्यामकुळे, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, हनुमाननगर झोन सभापती कल्पना कुंभलकर, धंतोली झोन सभापती वंदना भगत, नेहरूनगर झोन सभापती स्नेहल बिहारे, गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, सतरंजीपुरा झोन सभापती अभिरूची राजगिरे, लकडगंज झोन सभापती मनीषा अतकरे, आशीनगर झोन सभापती वंदना चांदेकर, मंगळवारी झोन सभापती प्रमिला मंथरानी, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, पशुचिकीत्सक अधिकारी डॉ.गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त सर्वश्री गणेश राठोड, प्रकाश वराडे, अशोक पाटील, विजय हुमने, हरीश राउत, घनश्याम पंधरे, सहायक आयुक्त किरण बगडे, साधना पाटील यांच्यासह दहाही झोनल अधिकारी आणि दोन्ही कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रारंभी दोन्ही कंपन्यांद्वारे आणि झोनमार्फत सादर करण्यात आलेल्या कंपन्यांचे कर्मचारी, वाहन आदींच्या माहितीची पडताळणी करण्यात आली. यामध्ये काही झोनमध्ये कंपनी आणि झोनद्वारे देण्यात आलेल्या आकडेवारीमध्ये तफावत दिसून आली. पुढे कंपनीच्या कार्यपद्धतीबद्दल झोनच्या सहायक आयुक्तांचे अभिप्राय घेण्यात आले. यामध्ये सहायक आयुक्तांनी कंपन्यांच्या कार्याबद्दल समाधानी नसल्याचे मत मांडले. यापूर्वीच्या बैठकीमध्ये झोनल अधिका-यांद्वारे शंभर टक्के समाधानी असल्याचे मत मांडण्यात आले होते. झोनच्या नगरसेवकांचे प्रतिनिधीत्व करणा-या झोन सभापतींद्वारे सुद्धा कामाबद्दल असमाधान व्यक्त करण्यात आले. अशात झोनल अधिकारी आणि सहायक आयुक्तांच्या अभिप्रायामध्ये विसंगती आढळून आल्याने समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी चौकशी पुढे वाढविण्याचा निर्णय घेत नगरसेवकांचे अभिप्राय नोंदविण्याचे निर्देश दिले. येत्या सात दिवसामध्ये झोन स्तरावर उपायुक्त राजेश भगत यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक घेउन त्यांचे लेखी तसेच मौखिक अभिप्राय घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. माजी महापौर व आमदार प्रवीण दटके व विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांनीसुध्दा पत्र देवून समिती पुढे आपले मत मांडण्यासाठी वेळ मागितला आहे, अशी माहिती ठाकरे यांनी दिली.

बसपा गटनेता जितेंद्र घोडेस्वार यांच्याद्वारे दाखल व्हिडिओमध्ये ट्रकमध्ये माती मिश्रीत कचरा असल्याचे निदर्शनास आल्याप्रकरणी संबंधित ट्रक चालक व मालक यांना पुढील बैठकीत बोलावून त्यांचे बयाण नोंदविण्याचेही निर्देश समिती अध्यक्षांनी दिले. याशिवाय झोनच्या सहायक आयुक्तांमार्फत कंपनीच्या बिलांवर सही करताना व कंपनीवर दंडात्मक कारवाई करताना कोणत्या प्रणालीचा अवलंब केला जातो, याचाही अहवाल सादर करण्याचे निर्देश समिती अध्यक्ष सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी दिले.