Published On : Tue, Oct 3rd, 2017

नागपूरमधील स्मृती मंदिर परिसराची जागा संघाची नाही, रा.स्व.संघाचा कोर्टात दावा

Advertisement


नागपूर :
नागपूरच्या रेशीम बाग परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्मृती मंदिर परिसर संघाचा नसल्याचा दावा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीनं करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ही जागा डॉ. हेडगेवार स्मृती मंदिराची असल्याचंही स्पष्टीकरण संघाच्यावतीनं कोर्टात प्रतिज्ञापत्राद्वारे देण्यात आलं.

रा.स्व.संघाच्या परिसरात सुशोभिकरण करण्यासाठी नागपूर महापालिकेने पैसे दिल्याचा आरोप करत एक जनहित याचिका नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. यात रा.स्व.संघाला प्रतिवादी करण्यात आलं आहे.

याप्रकरणी संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी हा संपूर्ण परिसर रा.स्व.संघाचा नसल्याचं प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितलं आहे. तसेच ही संपत्ती डॉ. हेडगेवार स्मृती मंदिराची असल्याचंही भय्याजी जोशी यांनी स्पष्ट केलं आहे.

नागपूरमधील रेशीम बाग परिसरात रा.स्व.संघाची मोठी इमारत आहे. तसेच याच परिसरात संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचं स्मृती मंदिर देखील आहे. या परिसराला संरक्षक भिंत आणि आतील बाजूस सिमेंटचा रस्ता तयार करण्यासाठी नागपूर महापालिकेने 1.37 कोटी रुपये दिल्याचा आरोप होत आहे.

याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांनी नागपूर खंडपीठात एक जनहित याचिकाही दाखल केली आहे. या याचिकेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना धर्मादाय आयुक्त कार्यालयात रजिस्टर नाही. तरीही महापालिकेच्यावतीने या संघटनेच्या परिसराचं सुशोभिकरणासाठी महापालिकेनं पैसे दिल्याचं, म्हटलं आहे.

यावर न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती अरुण उपाध्याय यांच्यासमोर सुनावणी सुरु होती. यावेळी खंडपीठाने रा.स्व.संघासह महापालिका आयुक्त आणि स्थायी समितीचे अध्यक्षाकडून 3 ऑक्टोबरपर्यंत उत्तर मागवलं होतं. त्यावर उत्तर देताना संघाने ही जागा आपली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.