Published On : Wed, Dec 5th, 2018

राज्य भारनियमन मुक्तच : विश्वास पाठक

Advertisement

कोळसा पुरवठा खर्चात बचत,MOD संकल्पनेने ग्राहकाचा फायदा, शेतकऱ्यांना 8 तास वीज देणारच

नागपुर: गेल्या 4 वर्षात हे राज्य भारनियमन मुक्त झाले असून वीज पुरवठा खंडित झाला म्हणजे भारनियमन नाही. शेतकऱ्यांना 8 तासाऐवजी 7 तास वीज दिली तर ते भारनियमन म्हणता येईल.राज्यात आजघडीला कुठेही भारनियमन नाही, अशी माहिती श्री विश्वास पाठक यांनी मुंबई येथे पत्रकारांना दिली।

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 4 वर्षात ऊर्जा विभागाने केलेल्या कामाचा आलेख मुंबई येथे पत्रकारांसमोर ठेवला.* *याप्रसंगी बोलताना श्री पाठक म्हणाले वीज कपात फक्त थकबाकी असेल तेथेच पुरवठा खंडित केला जातो सरसकट वीज पुरवठा खंडित केला जात नाही.*

भारनियमन हे वीज नियामक आयोगाच्या सुचनेशिवाय महावितरण करू शकत नाही, असे सांगताना श्री पाठक म्हणाले शेतकरी केंद्रबिंदू असलेल्या शासनाने 4 वर्षात शेतकऱ्यांच्या 5 लाख कृषी पंपाना वीज कनेक्शन दिले आहेत.यानंतर पैसे भरून प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपाना HVDS योजनेतून कनेक्शन देत आहे, असेही पाठक म्हणाले.

शेतकऱ्यांना दिवसा 12 तास विजेच्या पुरवठ्याची मागणी समोर आली आहे, याकडे लक्ष वेधून श्री पाठक म्हणाले मुख्यमंत्री सौर कृषी वहिनी योजना आणली आहे. राज्यात अहमदनगर जिल्ह्यात राळेगणसिद्धी व यवतमाळ जिल्हयात कोळंबी, नागपूर जिल्ह्यात बुटीबोरी, खापा येथे सौर ऊर्जेचे प्रकल्प सुरू झाले आहे. आज शेतकऱ्यांना या विजेचा लाभ मिळत आहे.

महानिर्मितीला कोळसा पुरवठा करताना खरेदी, कोळसा वाहतूक, गुणवत्ता या बाबींमधून 4 वर्षात आम्ही एक हजार कोटींची बचत केली आहे. MOD संकल्पना आयोगाने आणली त्यामुळे महाग वीज निर्मिती करणारे केंद्र आपोआप बंद पडले आणि MOD संकल्पनेत बसणारे केंद्र मात्र सुरू राहतात. याचा फायदा ग्राहकांना मिळाला आहे.

राज्यात ज्या तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित झाला त्या तालुक्यांत 33 टक्के वीज बिल माफ करून बिल वसुली थांबवली आहे, असे सांगून श्री पाठक म्हणाले सौभाग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व भागात वीज पोचली आहे, गडचिरोली आणि नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात काही ठिकाणी अजून वीज पोहोचली नाही. मात्र डिसेंबरअखेरपर्यंत दुर्गम भागात वीज पोचली असेल, असेही ते म्हणाले.

*या वेळी पत्रकारांनी विचारलेल्या वीज दर,मीटर तुटवडा, केंद्रीय बीज बिल केंद्र, मुंबईत वीज दर एकसारखे असावेत आदी प्रश्नांना पाठक यांनी समर्पक उत्तरे दिली.

राज्याच्या ऊर्जा विभागाला 4 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तसेच या कालावधीत ऊर्जा विभागाने केलेली कामे, राबविलेल्या योजना, घेतलेले सकारात्मक व ग्राहकोपयोगी निर्णयांची माहिती श्री विश्वास पाठक यांनी संपूर्ण राज्यात जिल्हास्थानी जाऊन पत्रकारांना दिली. गेल्या 12 नोव्हेंबरपासून ते राज्याच्या दौऱ्यावर होते. मुंबई येथे आज पत्रपरिषद घेऊन त्यांनी या दौऱ्याचा समारोप केला.