Published On : Thu, Apr 22nd, 2021

ऑक्सिजन, रेमडेसीविर इंजेक्शन, खासगी रुग्णालयातील बेड्स याचे नियोजन करण्यात राज्य शासन व प्रशासन सपशेल अपयशी

Advertisement

भाजपा प्रदेश सचिव ऍड. धर्मपाल मेश्राम यांचा आरोप

नागपूर : आज संपूर्ण राज्यासह नागपूर शहर हे कोरोना या वैश्विक महामारीचा सामना करीत असताना ऑक्सिजन, रेमडेसीविर इंजेक्शन आणि खासगी रुग्णालये नियंत्रणात असताना सुद्धा बेड्सचे नियोजन करण्यात राज्य शासन व प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे, असा आरोप भाजपा प्रदेश सचिव तथा नगरसेवक ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील आरोग्य यंत्रणेच्या सुविधेसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालविले आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी विशाखापट्टणम येथून त्याचा पुरवठा करणे, व्हेंटिलेटरची व्यवस्था करणे, सर्व व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी सीएसआर निधी उपयोगात आणणे, अशी उत्तम योजना त्यांनी कार्यरत केली आहे. त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरात ठाण मांडून आहेत व सर्व परिस्थितीचा आढावा घेत आहेत. द्रव ॲाक्सीजन चा पुरवठा, रुग्णांसाठी हेल्पलाईन, नॅशनल कॅन्सर इन्स्टीट्यूट मधील कोविड बेड व्यवस्था या सर्व आघाड्यांवर ही नेते मंडळी कार्यरत आहेत. परंतू या सर्व व्यवस्थेमध्ये राज्य शासन व मनपा प्रशासन यांचे कुठेही समन्वय आणि कार्य दिसून येत नाही. या दोन्ही यंत्रणा पूर्णतः हतबल झाल्याचे दिसून येत आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून पुरविले जाणारे खासगी रुग्णालयातील बेड्सचा लाभ गरजूंना मिळत आहे की मनपाच्या नियंत्रणात असलेले खासगी रुग्णालये हेच आपल्या पद्धतीने त्याचा वापर करीत आहेत, याचा तपास होणे अत्यंत आवश्यक आहे. यावर मनपा प्रशासनाने नियंत्रण मिळवावे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

आज नागपूर शहरात अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. रेमडेसीविर इंजेक्शनचा उपलब्ध साठा व त्याचे वितरण व्यवस्थित नाही, ऑक्सिजनच्या व्यवस्थेचे नियोजन नाही तसेच मनपाच्या नियंत्रणात असलेली खासगी रुग्णालयामधीलही बेड्स चे नियोजन व नियंत्रण करणारी संपूर्ण यंत्रणा सपशेल अपयशी ठरली असून यावर जर लवकरच नियंत्रण आणून सुरळीत न झाल्यास या शहरात अराजकसदृश स्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी दिला आहे.

खासगी रुग्णालयातील बेड्सचे ८०:२० टक्के असे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार मनपा हद्दीतील सर्व खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड्स हे मनपा प्रशासनाच्या नियंत्रणात राहतील. म्हणजे ८० टक्के बेड्स हे मनपाच्या निर्धारित नियमानुसार कार्यान्वित असणे अपेक्षित आहे. तर २० टक्के बेड्स हे संबंधित खासगी रुग्णालय प्रशासनाच्या नियंत्रणात राहणे अपेक्षित आहे. मात्र एकही बेड्स चे ८०% नुसार कार्यान्वयन होत नाही. कुणाला गरज असल्यास मनपाद्वारे बेड्स ही उपलब्ध करून दिले जाऊ शकत नाही. एकही बेड मनपाची यंत्रणा प्रशासकीय स्तरावर उपलब्ध करून देण्यास पात्र दिसत नाही. ८० आणि २० टक्के या दोन्ही माध्यमातून बेड्स भरण्यासाठी प्रशासकीय स्तरावर काही टोळी तर संगनमताने कार्य करत नाही ना ? अशी शंकाही ऍड. मेश्राम यांनी व्यक्त केली आहे.

मनपा प्रशासनाद्वारे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले. मात्र नियंत्रण कक्षामध्ये संपर्क साधल्यास कुणीही त्याला प्रतिसाद देत नाही. एकूणच या संकटाच्या प्रसंगी महानगरपालिकेची संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कोलमडली असून ती निष्क्रीय झाली आहे. त्यावर कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. नियमांतर्गत असलेले ८० टक्के बेड्स भरणारी टोळी मनपा प्रशासनाच्या संगनमताने कार्यरत तर नाही ना, अशी शंकाही त्यांनी वर्तविली. जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रणात असलेले रेमडेसीविर इंजेक्शन काळ्या बाजारात उपलब्ध होणे, ऑक्सिजन सिलेंडरही आता त्याच अवस्थेत आहे. या सर्व परिस्थितीचे गांभीर्य जपून आता तरी मनपा प्रशासन आणि राज्य शासनाने जबाबदारी ने कार्य करून शहरातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने कार्य करावे, अशीही मागणी भाजपा प्रदेश सचिव ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी केली आहे.
त्याचप्रमाणे शहरातील उद्योजक, समाजसेवी, धार्मिक व अशासकीय संस्थांनी एकत्र येवून वर्तमानकाळात निर्माण झालेल्या स्वास्थ्यसंबंधी गोंधळाचा सामना करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही धर्मपाल मेश्राम यांनी केले आहे.