स्थापती समिती सभापतींचे निर्देश : दोन्ही झोनमध्ये घेतला आढावा
नागपूर : नागपूर महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या सतरंजीपुरा आणि लकडगंज झोनमधील प्रलंबित आणि रखडलेल्या कामांचा आढावा स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांनी गुरुवारी (ता. २) घेतला.
सतरंजीपुरा झोनमधील बैठकीला सभापती अभिरुची राजगिरे, नगरसेवक संजय चावरे आणि झोन सहायक आयुक्त घनश्याम पंधरे तर लकडगंज झोनमधील बैठकीला सभापती मनीषा अतकरे, नगरसेविका चेतना टांक, नगरसेविका सरिता कावरे, जयश्री रारोकर, नगरसेवक अनिल गेंडरे, पुरुषोत्तम हजारे आणि झोन सहायक आयुक्त साधना पाटील उपस्थित होत्या.
दोन्ही झोनमधील सन २०१९-२० पासून मंजुरी प्राप्त, आदेश झालेली कामे सुरू करताना काय अडचणी आहेत, हे सभापती राजेंद्र सोनकुसरे यांनी जाणून घेतले. कामे सुरू करण्यासाठी प्रशासनातर्फे मुदतवाढ घेऊन काम सुरू करण्याचे निर्देश दिले. बांधील खर्चात आलेले काम, झोनल बजेट, फिक्स प्रायोरिटी, वॉर्डनिधी इत्यादी कामे तत्परतेने मंजूर करण्यात यावे व या दोन्ही झोन अंतर्गत रस्ता दुरुस्तीची लवकरात लवकर करण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी बाजारासंदर्भातही चर्चा झाली. गरिबांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने बाजारांना जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. जाहिरात फलकाच्या माध्यमातून होणारे उत्पन्न हे मनपाच्या उत्पन्नाचे मोठे स्त्रोत आहे. मात्र अनेक अवैध फलके लागून आहेत.
यामुळे मनपाचे नुकसान होत असून अशा फलकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. अधिकृत, अनधिकृत मोबाईल टॉवर्सची यादीही समितीला सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. दोन्ही झोनमध्ये मनपाच्या खुल्या जागांवर अतिक्रमण होऊ नये, याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी. झोनस्तरावर त्याची यादी तयार करून त्यावर मनपाच्या मालकीचे असल्याचे फलक लावावे. सुरक्षा भिंत बांधण्यासाठी प्रस्ताव सादर करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. सिवर लाईन दुरुस्तीच्या कामांना प्राधान्य द्यावे, असेही निर्देश त्यांनी दिले.
यावेळी सभापती व नगरसेवकांनी त्यांच्या कामात येणाऱ्या अडचणी सांगितल्या. मंजूर व आदेश प्राप्त कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचना केल्या.