Published On : Fri, Sep 3rd, 2021

सुदृढ नागपूरसाठी शहरात १७० आरोग्य शिबिर : महापौर दयाशंकर तिवारी

Advertisement

गांधीबाग झोनमधील कर्मचा-यांची आरोग्य तपासणी

नागपूर: नागपूर शहरातील प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी आरोग्य संबंधी विविध उपक्रम नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरात राबविण्यात येत आहेत. गांधीबाग झोन कर्मचा-यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर हा त्यातीलच एक भाग आहे. पुढील काळात शहरात १७० आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येणार असून नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.

गांधीबाग झोनच्या सभापती श्रद्धा पाठक यांच्या पुढाकाराने झोन कर्मचा-यांसाठी गुरूवारी (ता.२) श्रीमंत राजे रघुजी भोसले नगरभवन (महाल टाउन हॉल) येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर झोन सभापती श्रद्धा पाठक, नगरसेविका नेहा वाघमारे, सुमेधा देशपांडे, झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी ख्वाजा मोईनुद्दीन, यादव हॉस्पीटलचे नेत्र विशेषज्ज्ञ डॉ.एस. यादव आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या नागरिकांसाठी महात्मे नेत्रपेढीच्या सहकार्याने महापौर नेत्रज्योती शिबिर आयोजित करण्यात येत आहे. या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. महापौर दृष्टीसुधार योजनेच्या माध्यमातून तिरळेपणा दूर करण्यात येणार आहे. शहरात ७५ हेल्थपोस्टचा शुभारंभ २ ऑक्टोबरला करण्याचा मानस आहे. शासकीय दंत रुग्णालय व महाविद्यालयाच्या सहकार्याने दंतरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात येत आहे. सामान्य नागरिक पैशाअभावी अथवा सोयीअभावी वैद्यकीय उपचापासून वंचित राहू नयेत हा यामागचा हेतू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या सर्व सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

झोन सभापती श्रद्धा पाठक यांनी प्रास्ताविकात माहिती देताना सांगितले की, झोनच्या बैठकीमध्ये महिला कर्मचा-यांनी आरोग्य तपासणीचा मुद्दा मांडला होता. त्याची तातडीने दखल घेत या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

शिबिरात कर्मचा-यांची विविध आजारांची तपासणी करण्यात आली. यादव हॉस्पीटलतर्फे नेत्र तपासणी करण्यात आली. सदर शिबिरात सेव्हनस्टार हॉस्पीटलचे डॉ. नेहा रहांगडाले, सतीश चंदेल, नेहा सोनटक्के, श्वेता अग्रवाल, मालती बाथो, मंदा पाटील, गांधीबाग झोनचे सहायक अधीक्षक प्रकाश गायधने, प्रशांत डुडूरे, ज्योती काळे, संजय भोसले, धनराज मेंढेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. शमा मुजावर यांनी केले.