Published On : Sat, Mar 17th, 2018

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून नदी, नाले सफाईचे कामे सुरू करा

Advertisement


नागपूर: मागील वर्षी पहिल्या पावसात शहरातील ज्या-ज्या ठिकाणी पाणी साचले होते त्या ठिकाणी पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. आवश्यक त्या डागडुजी करा. मशीन आणि कर्मचारी सज्ज ठेवा. नदी, नाले साफसफाईची कामे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू करा, असे निर्देश मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिले.

मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात आयोजित पावसाळापूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. आरोग्य समितीचे सभापती मनोज चापले, अपर आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, उपअभियंता (नद्या व सरोवरे) मो. इसराईल,सहायक आयुक्त प्रकाश वराडे, हरिश राऊत, राजेश कराडे, सुभाष जयदेव हरिश राऊत, राजू भिवगडे, महेश मोरोणे, स्मिता काळे, सुवर्णा दखने व सर्व झोनल अधिकारी यावेळी उपस्थित होते.

आयुक्त अश्विन मुदगल यांनी मागील वर्षी १७ जुलैला झालेल्या पावसात शहरातील ज्या-ज्या वस्तीमध्ये, भागांत, परिसरात पाणी साचले होते, त्या ठिकाणची आताची परिस्थिती काय, याचा आढावा झोन सहायक आयुक्तांकडून घेतला. जी कामे अद्यापही अपूर्ण आहेत, ती तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. नरेंद्र नगर येथील रेल्वे अंडर ब्रीजमध्ये पाणी साचले तर त्यासाठी मड पंप आणि पाणी फेकणाऱ्या मशीन सज्ज ठेवण्यात याव्या, ज्यांची दुकाने, घरे बेसमेंट मध्ये आहेत त्यांना तातडीने नोटीस बजावून आवश्यक त्या उपाययोजना स्वत: कराव्यात, रेल्वे विभागासोबत समन्वय साधून त्यांच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्या, आयआरडीपीच्या नाल्या स्वच्छ करण्यात याव्या, नाग नदी, पिवळी नदी, पोहरा नदी स्वच्छ करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी, त्यातून निघणारा गाळ हा भिंतीला लावून न ठेवता तो इतरत्र नेण्यात याव्या, गाळ टाकण्यासाठी आवश्यक त्या जागा शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

सीएसआर फंडातून कामे करण्यासाठी पत्र
शहरातील मॉईल, वेकोलि व अशा अनेक कंपन्यांना पत्र पाठवून त्यांच्या सीएसआर फंडातून नदी, नाले स्वच्छता करण्यासाठी त्यांना पत्र पाठविण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. नाले साफ, सफाई अभियानाचे संपूर्ण समन्वयन झोन स्तरावर सहायक आयुक्तांनी करावे, असे निर्देश दिले.

मेट्रोलाही देणार पत्र
नागपूर शहरात मेट्रो रेल्वेचे काम प्रगतीपथावर आहे. मागील वर्षी या कामामुळे अनेक काही प्रमाणात पावसाचे पाणी साचण्याचे प्रमाण वाढले होते. यावर्षी तशी शक्यता लक्षात घेता मेट्रो रेल कार्पोरेशन लि.लाही पत्र पाठवून आवश्यक त्या उपाययोजना बांधकाम परिसरात करण्याचे निर्देश आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिले.

कुठलीही हयगय होणार नाही याची काळजी घ्या : चापले
मागील वर्षी नदी, नाले साफसफाईचे काम ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सुरू झाले होते. त्यामुळे थोडी धावपळ झाली. यंदा तसे होणार नाही, याची काळजी घ्या, असे निर्देश त्यांनी दिले. नाग नदी व अन्य नद्यांतून गाळ काढल्यानंतर तो नदीतच संरक्षक भिंतीला लागून ठेवण्यात येतो. त्यामुळे तो पुन्हा वाहून जातो. यावर्षी तसे होणार नाही. त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करा, असे ते म्हणाले.