डॉ. केशव हेडगेवार अभ्यासिका, ई-लायब्ररीचे लोकार्पण
नागपूर: नागपूर महानगरपालिकेने तयार केलेल्या कोठीरोड महाल येथील अद्ययावत डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार अभ्यासिका व ई-लायब्ररी, चिटणवीसपुरा रतन कॉलनी येथील उपवन वाचनालयाचे लोकार्पण तसेच सी.पी. ॲण्ड बेरार कॉलेजजवळील चौकाचे कविवर्य स्व. राजा बढे चौक असे नामकरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार होत्या. यावेळी मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त अश्विन मुदगल, माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, नगरसेविका सुमेधा देशपांडे, नगरसेविका नेहा वाघमारे, नगरसेवक धर्मपाल मेश्राम, प्रमोद चिखले, पिंटू झलके, मनपातील प्रतोद दिव्या धुरडे, नगरसेविका सारिका नांदूरकर, नगरसेवक राजेश घोडपागे, हनुमाननगर झोन सभापती भगवान मेंढे, भारतीय शिक्षण मंडळ अनुसंधान न्यासचे संयोजक डॉ. राजेश बिनिवाले आदींची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना ना. नितीन गडकरी म्हणाले जग अत्याधुनिक होत आहे. त्यानुरूप लायब्रऱीपण अत्याधुनिक होणे ही स्थानिक नगरसेविकांनी मागणी केली. मनपाची शाळा बंद झाली, त्याजागी ई- लायब्ररीचे तयार करण्यासाठी माजी महापौर आणि प्रभागाचे नगरसेवक प्रवीण दटके यांनी पुढाकार घेतला. महालातील गोर गरीब विद्यार्थ्यांसाठी ही लायब्ररी नक्कीच फायदेशीर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना येथून शिकवणी वर्ग सुरू होतील. ज्येष्ठ नागरिकांसाठी येथे विरंगुळा केंद्र उभारण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी महापौर प्रवीण दटके यांनी केले. गांधीबाग झोन सभापती सुमेधा देशपांडे यांनी संचालन केले. उपअभियंता बुंदाडे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला माजी आमदार मोहन मते, माजी स्थायी समिती सभापती बंडू राऊत, माजी आमदार यशवंत बाजीराव यांच्यासह भाजप कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.