Published On : Wed, Jan 29th, 2020

मनपाच्या बंद पडलेल्या शाळा सुरू करा!

Advertisement

जनता दरबारात उपमहापौर मनीषा कोठे यांचे निर्देश : हनुमाननगर झोनमध्ये ४० तक्रारींवर निर्णय

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या बंद पडलेल्या शाळा सुरू करुन दर्जेदार शिक्षण देण्याची परंपरा पूर्ववत सुरू कराव्या, ज्या शाळा सुरू आहेत तेथील सोयीसुविधा दर्जेदार करा. तातडीने यासंदर्भात कार्यवाही सुरू करावी, असे निर्देश उपमहापौर मनीषा कोठे यांनी दिले.

महापौर संदीप जोशी यांचा जनता दरबार बुधवारी (ता. २९) हनुमाननगर झोन कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपमहापौर मनीषा कोठे यांनी नागरिकांच्या तक्रारी आणि गाऱ्हाणी ऐकून घेत त्यावर निर्णय दिले. हनुमान नगर येथील जनता दरबारात अतिक्रमण, स्वच्छता, फॉगींग, गटर लाईन, अवैध बांधकाम, चेंबरवरील झाकण आदीसंदर्भात प्रामुख्याने तक्रारी होत्या.

यावर निर्णय देताना उपमहापौर यांनी सर्व अधिकाऱ्यांना तक्रारींशी संबंधित आवश्यक ते निर्देश दिलेत. स्वच्छतेशी संबंधित सर्व तक्रारींना गांभीर्याने घेत तातडीने आरोग्य निरिक्षकांना संबंधित तक्रारींवर कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेत. अतिक्रमणाच्या तक्रारींनाही गांभीर्याने घ्या. जनता दरबारात अतिक्रमणासंदर्भात जेवढ्या तक्रारी आल्यात त्यावरही तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

हनुमान नगर झोनच्या जनता दरबारात एकूण ३८ तक्रारींची नोंदणी झाली होती. त्यापैकी २७ तक्रारकर्ते प्रत्यक्ष हजर होते. त्यावर उपमहापौरांनी त्याच वेळी निर्णय दिलेत. १३ तक्रारी वेळेवर आल्या. त्या तक्रारींमधील त्याच वेळी सोडविता येतील,अशा तक्रारींसंदर्भातही त्यांनी कार्यवाहीचे आदेश दिले.

जनता दरबारात उपमहापौर मनीषा कोठे यांच्यासह हनुमाननगर झोन सभापती माधुरी ठाकरे, स्थापत्य व प्रकल्प समितीचे सभापती अभय गोटेकर, जलप्रदाय समितीचे उपसभापती भगवान मेंढे, गलिच्छ वस्ती निर्मूलन समितीच्या उपसभापती उषा पॅलट, नगरसेविका रूपाली ठाकूर, लिला हाथीबेड, विद्या मडावी, स्वाती आखतकर, शीतल कामडे, कल्पना कुंभलकर, मंगला खेकरे, नगरसेवक सतीश होले, रवींद्र भोयर, दीपक चौधरी, नागेश मानकर, राजेंद्र सोनकुसरे, हनुमाननगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे, कार्यकारी अभियंता अविनाश बाराहाते, उपअभियंता के.सी. हेडाऊ, कनिष्ठ अभियंता प्रकाश धवडे, आनंद लामसोंगे, संजय पडोळे, ओसीडब्ल्यू झोन क्र. तीन चे डेलिगेट राजू पवार, उद्यान निरीक्षक नागमोते, कनिष्ठ अभियंता राजेश तेलरांधे, झोनल अधिकारी डी. एम. कलोडे, जलप्रदायचे डेलिगेट दीक्षित, नगररचना विभागाचे अभियंता देशपांडे यांच्यासह तक्रारकर्ते नागरिक उपस्थित होते.