कोराडी महालक्ष्मी जगदंबा मंदिरात प्राणप्रतिष्ठा समारोह प्रारंभ

माजी पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते पूजा

नागपूर: जीर्णोध्दारानंतर नवनिर्मित कोराडी महालक्ष्मी जगदंबा मंदिरात अत्यंत भक्तिमय वातावरणात आाज प्राणप्रतिष्ठा समारोहास व विधिवत पूजेस प्रारंभ करण्यात आला. या समारोहाचे मुख्य यजमान माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज पूजा करण्यात आली.

सर्वप्रथम सकाळी 9 वाजता भव्य सभामंडपात पंडित युवराज पालीवाल व त्यांच्या सहकार्‍यांद्वारा श्रीगणेश पूजन करण्यात आले. त्यानंतर माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व सौ. ज्योतीताई बावनकुळे, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. मुकेश शर्मा व त्यांच्या पत्नी सौ. सुनीता शर्मा, उपाध्यक्ष अजय विजयवर्गी यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. याप्रसंगी संकेत बावनकुळे उपस्थित होते. सकाळपासून दुपारी 12 वाजेपर्यंत ही पूजा चालली. अनेक धार्मिक विधि या दरम्यान करण्यात आले. त्यानंतर गणेशमूर्तीला अभिषेक, भैरवनाथ

मूर्ती, नंदीच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. दिव्यकलश व ध्वजपूजन मंत्रोपचारात करण्यात आले.यावेळी गणपती अथर्वशीर्ष पाठ व कलभैरव अष्टकाचे पाठ करण्यात आले. सायंकाळी 4 वाजता पुन्हा गणेेशपूजन, पुण्याहवाचन, कलशपूजन, कुलदेवी षोडसमांत्रिका पूजन, मंडल पूजन करण्यात आले. त्यानंतर अग्निमंथन द्वारा शास्त्रोक्त पध्दतीने हवनकुंड प्रज्वलित केले. हवन, पूजनानंतर मूर्तींची पूजा करण्यात येऊन पहिल्या दिवसाचा कार्यक्रम समाप्त झाला.